मग बंगाल्याने बिहारीला ' चले जाव ' म्हणावे, बिहारीने बंगा-ल्याला ! तामीळबंधूने तेलगू बंधूस, तेलगू बंधूने तामीळबंधूस. कानडी बंधूंनी महाराष्ट्रीयांस, महाराष्ट्रीयांनी गुजरात्यांस; असे का एकमेकांना खो देत रहायचे? आज हे प्रकार होत आहेत. श्री जयप्रकाश मद्रासच्या बाजूला दौ-यावर असता, आम्हाला स्वतंत्र द्रविडीस्थान द्या. आर्यांनी आमचा नाश केला, आर्य भाषेतील शब्द काढून टाका, अशा चाललेल्या चळवळी त्यांनी पाहिल्या. त्यांना दु:ख झाले. कोठे आहे भारत ?प्रत्येक प्रांत का स्वतंत्र होणार? हे असहिष्णू प्रकार कोण थांबवणार? आपणच याला आळा घालूया - आळा कशाने घालता येईल? परस्परांची भाषा अभ्यासून. एखादी तरी द्रविडी भाषा आपल्याला आलीच पाहिजे; मातृभाषा नि हिंदुस्थानी याशिवाय. जयप्रकाश मद्रासकडे हिंडतांना आधी चार वाक्ये तामीळमध्ये बोलत. लोकांना आनंद होई. भाषा अहंकारासाठी नसून हृदयाला पोचण्यासाठी आहे.
सेनापती नि मी अस्पृश्यता निवारणार्थ हिंडत असता गडहिंग्ल-जला गेलो. मला चिठ्ठी आली, ' गुरुजी कानडीत बोला.' मी म्हटले, 'तुरुंगात वाचायला शिकलो; परंतु बोलायला नाही. 'सेनापतींना वाईट वाटले. आमची मोटार लॉरीसारखी जात होती. बरोबर सेवादल पथकात कुतुब होता. त्याला कानडी येई. सेनापती म्हणाले, ' बंधू-भगिनींनो वगैरे मला कानडीत शिकव. 'सेनापतींनी चार वाक्ये पाठ केली. पुढच्या सभेत, 'बांधव रे मत्तु भगिनी रे' त्यांनी म्हटले. टाळयांचा कडकडाट झाला ! हृदयाला ते शब्द भेटले. विवेकानंद शिकागोला सर्वधर्म परिषदेसाठी गेले. सारे प्रतिनिधी 'सभ्य नरनारींनो ' असा आरंभ करीत. विवेकानंद 'बंधू-भगिनींनो ' म्हणाले आणि टाळया थांबत ना ! त्या दोन शब्दांनी त्यांनी सारी हृदये जिंकली. अशी ही मौज आहे. कानडी भाषा बोलत असले म्हणजे काय 'उंडुगुंडु ' चालवले आहे म्हणू नये. गुजरातीला 'अमळो ' असे हिणवू नये. ती ती भाषा कानावर पडली तर भावाची भाषा भेटली म्हणून नाचावे. थोडेथोडे शब्द येत असावेत, गाणी येत असावीत, आनंद वाटावा.
मी मुंबईस माटुंग्याच्या उडपी श्रीकृष्ण भुवन खानावळीत जातो. तेथे कानडी, तमीळ, तेलगू, मल्याळी सारे येतात. मला अपार आनंद होतो. भारतीय बंधूंचे दर्शन होते. मी देशभर कधी हिंडू-फिरू ? मला मित्र म्हणतात, 'इतक्या लांब कशाला जाता ?' तेथे मला माझा सारा प्यारा भारत भेटतो, हा आनंद त्यांना काय कळे ? विनोबाजी एकदा म्हणाले, 'आकाशातील सप्तर्षी पाहून मला नकाशातील काश्मिर नि युक्तप्रांत आठवतात ! 'जेथे जातो तेथे भारताचे भव्य दर्शन, असे भारतमय आपण होऊ या. हिमालय माझे डोके ,विंध्याद्रि माझा कंबर-पट्टा, पूर्व-पश्चिम तीरे माझे पाय.