महात्माजींची जयन्ती आली. शांती आणण्यासाठी, जातीय ऐक्य निर्मिण्यासाठी ते झुंज देत होते. आज कोठे आहेत गांधीजी? कोठे आहेत बापू? त्यांना कोठे शोधायचे, कोठे बघायचे? ते आपल्याजवळच  आहेत. गांधीजी चिरंजीव आहेत. ते अधिकच आपले झाले आहेत. त्यांचा आकार लोपला, परंतु त्यांचे विचार, त्यांची शिकवण यांना मरण नाही. उत्तरोत्तर त्यांचे हे वैचारिक जीवन, अनुभूतीचे ध्येयात्मक जीवन, सत्यप्रेमाने संपन्न असलेले जीवन अधिकच दैदीप्यमान होत जाईल.

अवतारी पुरुषांची आपण जयंती साजरी करतो. त्यांची पुणतिथि नाही साजरी करीत. रामनवमी, गोकुळअष्टमी साजरी करतो. परंतु संतांची, वीर पुरुषांची पुण्यतिथी साजरी करतो. दासनवमी, एकनाथ-षष्टी, तुकारामद्वितीया आपण साज-या करतो. श्री शिवछत्रपतींची पुण्यतिथी साजरी करतो. लोकमान्यांची करतो. गांधीजींचीच जयन्ती आपण साजरी करू लागलो. ते एक अपूर्व पुरुष होऊन गेले. गांधीजी अवतारी पुरुष. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत ते अवतरले. अवतार म्हणजे जो न्यायासाठी, सत्यासाठी दूर न राहता प्रत्यक्ष समाजात उतरून झगडतो. या दृष्टीने आपण थोरांना अवतार म्हणतो. महात्माजींनी अनेक क्षेत्रात प्रकाश आणला. म्हणून मी त्यांना मनात दशावतारी म्हणतो. वास्तविक ते शतावतारी, अनंतावतारी आहेत. ते विराट जीवनांत वावरत होते. मार्गदर्शन करत होते. परंतु सुलभतेस्तव मी त्यांना दशावतारी म्हणतो.

त्यांचा पहिला अवतार सत्यअहिंसेचा. येथे सारी किल्ली गुरुकिल्ली. महात्माजींचे महान जीवन म्हणजे या तत्त्वांचा विशाल अविष्कार. सत्य-अहिंसेतही सत्याला प्राधान्य. ते एकदा म्हणाले, 'एखाद्याचा खून करून रक्ताळ हातांनी तो खुनी माझ्याकडे आला व म्हणाला मी खून केला, तरी मी त्याला जवळ करीन. कारण तो सत्य सांगत आहे. परंतु असत्य मला क्षणभरही सहन होणार नाही.'  ईश्वर म्हणजे सत्य अशी ते व्याख्या करीत. प्रसिध्द युरोपियन  तत्त्वज्ञानी स्पायनोझा म्हणे, 'जग सत्यावरी चालले आहे. हा पूल पडत नाही. का ?  तेथे शास्त्रीय नियमांनुसार तो उभा आहे म्हणून.'  वेदामध्ये ऋत-सत्य हे शब्द नेहमी येतात. 'ऋत' म्हणजे विश्वव्यापक सत्य, विश्वाचे नियमन करणारे, सुसंवाद निर्माण करणारे सत्य. सत्यातूनच अहिंसा येते. मला कोणाचा नाश करावयाचा काय अधिकार ?  मी माझ्या सत्याप्रमाणे जात जाईन. त्याच्यात सम्यता असेल तर ती जगाला खेचील. महात्माजींनी सत्य-अहिंसा साधने घेतली. त्यातूनच ब्रह्मचर्य, अपरिग्रह इत्यादी सारी व्रते निघाली. सारी शक्ती पुरुषार्थासाठी वापरली पाहिजे म्हणजेच ब्रह्मचर्य आले. ब्रह्मचर्य म्हणजे सर्वेद्रियांचा संयम. शारीरिक, बौध्दिक, मानसिक संयम. शक्तीचा संचय करून त्या शक्तीने स्वत:चे जीवन व सभोवतालचे जीवन प्रकाशमय करीत जावयाचे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel