'मी येईपर्यंत तुम्ही येथे थांबा हां, जाऊ नका.' असे सांगून विजय गेला. एक नोकर हा सारा प्रकार पाहात होता. त्या मुलाचा राजाजवळ वशिला आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. हा नोकर म्हणजेच त्या म्हातार्याचा नातलग. म्हातार्याची व आपली गाठ पडू नये म्हणून तो आधीच प्रदर्शनमंडपात निघून आला होता; परंतु म्हातारा व त्याची मुलगी यांची राजाजवळ ज्याचा वशिला आहे अशाशी दोस्ती पाहून तो नातलग म्हातार्याजवळ आला.
'नमस्कार. मी तुमची किती वाट पाहिली घरी.'
'परंतु घरी चिठ्ठी तरी तुम्ही ठेवायची. ती तेथे दरवाजात दाखवता आली असती. तो मुलगा भेटला म्हणून बरे. नाही तर आज फजिती होती.' म्हातारा म्हणाला.
विजय केव्हा येतो याची ती मुलगी व म्हातारा वाट पाहात होती. म्हातारा दमून गेला होता. ती गडबड, तो आराडाओरडा, ती धक्काबुक्की यांनी तो थकून गेला होता. केव्हा येणार विजय? का तो विसरला या दोघांना?
'बाबा, फार का गळल्यासारखे वाटते?'
'होय बेटा. आता घरी जाऊ. त्या मुलासाठी येथे पत्ता देऊन ठेवू.'
तेथे असलेल्या दुसर्या एका नोकराजवळ 'त्या मुलासाठी हा पत्ता' असे सांगून त्या नातलगाबरोबर म्हातारा व मुलगी घरी निघून गेली. पुनः पुन्हा ती मुलगी मागे वळून पाहात होती; परंतु तो तरुण दिसला नाही.
विजय राजाकडे गेला. विनयाने खाली मान घालून तो उभा राहिला
'माईजींजवळ तू शिकतोस वाटते?' राणीने विचारले.
'होय सरकार.'
'चांगला शीक. मोठा कलावान हो. हे घे तुला सुवर्णपदक आणि हे शंभर रुपये.' राजा म्हणाला.