इतक्यात विजयही तेथे आला.
'हा पाहा विजयच आला. विजय खरं सांग, हे चित्र कोणाचे? ही यशोधरा ना?' बापाने विचारले.
'नाही बाबा. हे चित्र मुक्ताचे आहे.' तो म्हणाला.
'मी सांगितले नाही? त्या बुधगावच्या म्हातार्याची मुलगी. विजय, मी सांगत नव्हतो की, हे बरे नाही म्हणून?' ग्रामाधिकारी उपहासाने म्हणाला.
'विजय, तुला मी धर्माला वाहिले आहे. तू का असल्या फंदात पडलास? खबरदार! थांब, या चित्राच्या चिंधडयाच करून जाळून टाकतो. तुला भिक्षू व्हायचे आहे. यतिधर्माची दीक्षा घ्यायची आहे.' पिता गजरला.
'अशक्य, अशक्य! द्या माझे ते चित्र.' विजय म्हणाला.
पित्याने ते टरकावले. तुकडे केले. विजय वाघासारखा पित्याच्या अंगावर धावला. मंजुळेने त्याला आवरले.
'विजय, हे काय? शांत हो.' ती म्हणाली.
विजय थरथरत होता. ग्रामाधिकारी निघून गेला. बलदेव संतापाने लाल झाले होते. विजयने ते तुकडे गोळा केले. तो आपल्या खोलीत गेला. पाकळया जोडून पुन्हा फूल करून पाहावे त्याप्रमाणे तो ते तुकडे एकत्र करून ते चित्र जोडीत होता. ते कसे जमणार?
'दुष्ट आहेत बाबा.' तो म्हणाला.
'विजय, छान होते चित्र. ती मुक्ता का इतकी सुंदर आहे?' तिने विचारले.
'सुंदर आहे व सुस्वभावी आहे. मी यती होऊ शकणार नाही. संन्यास माझ्यासाठी नाही. मला सुखाचा संसार करू दे. ताई, बाबांचा हा काय आततायीपणा! मला त्यांनी कधी विचारलेही नाही. संन्यास का असा लादता येतो?'
'बरे हो. तुझे म्हणणे खरे आहे; परंतु एकदम संतापू नको. जरा जमवून घेतले पाहिजे. बाबांचे मन आपण हळुहळू वळवू. माईजी वळवतील. राजाकडूनसुध्दा बाबांना त्या पत्र आणवतील; परंतु जरा धीराने घे. निराश नको होऊ हो विजय.' असे म्हणून मंजुळा हळुहळू निघून गेली.
विजय त्या तुकडयांवर अश्रु-सिंचन करीत होता. ते चित्र जणू सजीव करू पाहात होता, अश्रूंनी सांधवू पाहात होता. अश्रूंच्या फुलांनी त्याची तो पूजा करीत होता.