विजयची वाट पाहून मुक्ता निराश झाली. आपले पत्र मिळाले की नाही, तिला समजेना. विजयवर आणखी तर काही संकट नाही ना आले, अशी शंका तिला येई. शशिकांत आता तीन वर्षाचा झाला. मोठा गोड सुंदर मुलगा.
'आई, केव्हा येतील बाबा?' तो विचारी.
'तूच सांग रे राजा. तुझे बोलणे खरे होईल.' ती त्याला पोटाशी धरून म्हणे.
तिचे वडील आजारी पडले. मुक्ता त्यांची शुश्रूषा करीत होती; परंतु एके दिवशी ते इहलोक सोडून गेले आणि रुक्माही गेला. मुक्ताने रुक्माची मनापासून सेवा केली.
'मुक्ता, तू सुखी होशील. माझा शब्द खोटा होणार नाही.' असे मरताना तो म्हणाला.
'मुक्ता, तू आता आमच्याकडे येऊन राहा.' बलदेव म्हणाला.
'विजय आला म्हणजे येईन. तोपर्यंत नको.' ती म्हणे.
माईजी आता दिवसेंदिवस क्षीण होत चालल्या. त्यांनी शिरसमणी येथे प्रचंड बुध्दमंदिर बांधायचे ठरविले. त्यांनी आपल्या जवळचे सारे जडजवाहीर विकले. मंदिराचे काम सुरू झाले. बुध्दधर्माचे येथे मुख्य केंद्र व्हावे, असे माईजींस वाटे. कनोजच्या राजाला त्यांनी लिहिल, 'राजगृहाकडून एखादा थोर भिक्षू येथे राहायला मिळाला तर पाहा.' कनोजच्या राजाने राजगृहाच्या महाराजांस कळविले. महाराजांनी मठाधिपतीस कळविले.
'सेवानंद, तुम्ही मूळचे कनोजकडचेच ना? तुमच्या राजाकडून एका योग्य भिक्षूची मागणी आली आहे. शिरसमणी येथे एक भव्य बुध्दमंदिर बांदण्यात आले आहे. तेथे बुध्दधर्माचे केन्द्र व्हावे, अशी त्या राजाची इच्छा आहे. तुम्ही तेथे जाल? गेलात तर फार छान होईल.'
'शिरसमणी का त्या गावाचे नाव?'
'हो. कोणी माईजी तेथे आहेत. त्यांनी हे सुंदर मंदिर बांधले आहे. तेथे एक लहानसा मठ आहेच; परंतु कोणी तरी थोर अधिकारी पुरुष त्यांना पाहिजे आहे. तुमच्याहून अधिक थोर आपणात कोण आहे? तुम्ही जा.'