'हे आणखी एक पदक घे.' राजकन्या म्हणाली.
'मुला, कधी आयुष्यात अडचण आली तर अर्ज कर. समजलास ना? कर्तबगार तरुण हो.' राजा म्हणाला.
विजय त्या सन्मानाने लाजला. तेथे गायन चालले होते. राजकन्येने त्याला बसायला सांगितले.
'हे गाणे तुमच्या ओळखीचे आहे?' तिने विचारले.
'होय. माईजी हे गाणे म्हणतात.' तो म्हणाला.
'बरोबर.' ती म्हणाली.
विजयचे लक्ष तेथल्या गाण्यात नव्हते. त्याचे लक्ष दुसरीकडे होते. ते वृध्द व त्यांची मुलगी आपली वाट पाहात असतील असे सारखे त्यास वाटत होते. शेवटी एकदाची त्याची तेथून सुटका झाली. तो आनंदाने व उत्सुकतेने पूर्वीच्या जागी आला; परंतू तेथे कोणी नव्हते. कोठे गेली ती मुलगी? कोठे गेला तो वृध्द? अशी कशी गेली? त्यांना का माझा मत्सर वाटला ? का ती कंटाळली ? परंतु त्यांनी निरोपही ठेवला नाही. कोठे शोधू त्यांना? ज्या नोकराजवळ त्या वृध्दाने व त्याच्या मुलीने निरोप व पत्ता देऊन ठेवला होता तो नोकर तेथे दार पिऊन पडला होता. त्याला शुध्द राहिली नव्हती. विजयने इकडे तिकडे पाहिले. शेवटी तो दरावाजातून बाहेर पडला. राजधानीत त्याने त्या दोघांना खूप शोधले, परंतु पत्ता लागेना. त्याला वाईट वाटले. ती पदके भिरकावून द्यावी असे त्याला वाटले. त्याला त्या मुलीचा राग आला. हसे तर गोड, परंतु अशी कशी फसवी? असे तो मनात म्हणाला. अशी सुंदर माणसे का मत्सरी असतील? शेवटी पत्ता लागत नाही असे पाहून तो राजधानी सोडून परत निघाला.
रस्त्याने हजारो लोक जवळपासचे जात होते; परंतु त्या गर्दीत ती मुलगी दिसत नव्हती, तो म्हातारा दिसत नव्हता. विजयला चुटपुट लागली. कशाला आपण राजाला चिठ्ठी पाठविले असे त्याला झाले. सोन्याचे पदक मिळविले, परंतु प्रेमाचे पदक गमावले असे त्याला वाटले.