विजय रात्रभर तेथे झोपला आणि पहाटे उठून निघून गेला. शहरातून हिंडत हिंडत जात होता. त्याच्याजवळ थोडे पैसे होते. त्याने काही खायला घेतले. तो शहराबाहेर आला. नदी होती तेथे ते आणलेले खाल्ले. पाणी पिऊन विश्रांती घेऊन तो पुन्हा निघाला.
मुक्ताची त्याला आठवण येत होती. ती रडत असेल बिचारी, असे मनात येऊन त्याला वाईट वाटे. आता जवळपास गाव नव्हते. तो जात होता. अंधार पडला. इतक्यात कोणी तरी येत आहे पाठोपाठ, असे त्याला वाटले. तो घाबरला. त्याची तलवार जवळ होती, परंतु तो एकटा होता. तो पळत सुटला. एका घराजवळ त्याला गुरांचा गोठा दिसला. तो त्या गोठयात घुसला. गाईच्या पुढील गवाणीत लपला. गवतात झोपला. ते पाठलाग करणारे आले. त्यांनी गोठयात पाहिले. कोणी नाही. ते गेले निघून. विजयने गोमातेचे आभार मानले. तो थकला होता. तेथेच गवताच्या उबेने तो झोपी गेला.
पहाटे जागा झाला. तो त्याला काय दिसले? त्याच्या अंगावरचे धोतर गाईने खाल्ले होते! त्या गाईला कपडे खाण्याची सवय होती. त्याचे धोतर ती चघळीत होती. त्याला आता निघाले पाहिजे होते. त्याला भूक लागली होती. तो मनात म्हणाला, 'गाई गाई, तू माझे धोतर खाल्लेस. आता तुझे दूध मला पोटभर पिऊ दे.' तो गाईजवळ गेला आणि दुधाच्या धारा आपल्या तोंडात पिळू लागला. त्याने आपल्या तोंडाची जणू चरवी केली. गाईने लाथ मारली नाही. धोतराचा तुकडा चघळीत होती व दूध देत होती. भरपूर पान्हा. जणू तो गाईचा वत्सच होता. दूध पिऊन विजय तेथून बाहेर पडला.
तो असा जात होता. तो त्याला वाटेत एक मुशाफिर भेटला. चाळिशी उलटलेला असा तो दिसत होता. तो सैनिक असावा. त्याच्याजवळ तलवार होती. धनुष्यबाण होते. कोण होता तो?
'नमस्ते. कोठे जाता?' त्याने विचारले.
'नमस्ते. आपण कोठे जाता? त्या मुशाफिराने विचारले.'
'माझे काही ठरलेले नाही. परिभ्रमण करीत आहे.'
'माझेही काही ठरलेले नाही. चला दोघे बरोबर जाऊ'
विजय व मुशाफिर बरोबर जाऊ लागले. त्या मुशाफिराचे नाव विहारी असे होते. ते नाव ऐकून विजयला आनंद झाला.