'सेवानंद, आज मोठी सभा भरवू. तो खुनी मनुष्यही एका बाजूस बसेल. तुमचे प्रवचन ऐकून त्याच्या डोळयांना पाणी आले, तर त्याला मी सोडीन. आज अहिंसाधर्माची कसोटी आहे.' राजा म्हणाला.
आणि सभा भरली. हजारो लोक व्यवस्थित बसले होते आणि तो खुनी इसमही बसला होता. सेवानंद आले. त्यांची ती उंच प्रसन्न मूर्ती पाहून सर्वांच्या डोळयांचे पारणे फिटले. त्या खुनी इसमानेही हात जोडले.
सेवानंदांचे प्रवचन सुरू झाले.
'बंधूनो, तुम्हाला मी दोन गोष्टी सांगणार आहे. भगवान बुध्द प्रेमाचा संदेश देऊन गेले; परंतु तो अजून आपल्या आचरणात नाही. जगातील दुःख दूर व्हावे म्हणून बुध्ददेव तळमळत. एकाही माणसाचे दुःख जोपर्यंत शिलज्क आहे, तोपर्यंत मी पुनः पाचशेही जन्म घेईन असे ते म्हणत. दुसर्याचे दुःख दूर करण्यासाठी ते गर्भवासाची अनंत दुःखे सहन करण्यास तयार होते. बंधूंनो जगात दुःख का आहे? हाच पाहा ना अभागी कैदी. तो खुनी आहे; परंतु त्याचा काय दोष? त्याला परिस्थितीच नीट अनुकूल मिळाली नाही. या तुमच्या राजधानीत मागे एक खुनी माझा खून करण्यासाठी आला होता. मी त्याला म्हटले, 'मी तुझे काय केले? तो म्हणाला, 'मी पोटासाठी खून करीत आहे. तुमचा मी खून केला तर कोणी मला ५०० रुपये देणार आहे.' मित्रांनो, त्या खुनी माणसाच्या घरी मुले उपाशी होती. त्याने काय करावे? राजा, राज्यात चोर्या होऊ नयेत, खून होऊ नयेत, म्हणून नुसत्या शिक्षा ठोठावून भागत नाही. चोरी होणार नाही, खून होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण कर. माणसास उचलून फाशी देणे सोपे आहे. त्याने खून केला, म्हणून तुम्ही त्याचा खून करता. तुम्हीही खुनीच. राजाचे कर्तव्य आहे की, सर्वांना काम मिळेल, सर्वांना उद्योगधंदा मिळेल, पोटाला मिळेल, याची व्यवस्था करणे. राजाचे काम आहे की, सर्वांना ज्ञान व आनंद मिळेस असे करणे.
कधी कधी द्वेषाने, मत्सरानेही खून होतात. सारेच काही पोटासाठी नसते. काही गोष्टी अर्थासाठी, काही कामासाठी; परंतु कोणत्याही परिस्थितीत अपराध्याचा वध करू नये. आपणास दुसर्याचे प्राण घेण्याचा अधिकार नाही. साधा एक किडा आपणास बनवता येणार नाही आणि आपण हृदय, बुध्दी, मन यांनी संपन्न मानव का एकदम मारून टाकावा? दगडांतून आपण अप्रतिम पुतळे निर्माण करतो, माणसातून सज्जन नाही का निर्मिता येणार? दगडातून का माणूस टाकाऊ आहे?