'विजय, तुला निघाले पाहिजे. काही दिवस तुला दूर गेले पाहिजे. येथे धोका आहे. तुझ्याबरोबर मी नाही येऊ शकत. बाबा एकटे; परंतु पुन्हा आपण भेटू. माईंजीकडून राजाच्या कानावर घालू. नीघ राजा. रुक्माकाका व मी तुला पोचवतो. जंगलातले सर्व रस्ते रुक्माकाकाला माहीती आहेत. कर तयारी. तू रुक्माकाकांची तलवार बरोबर घे. रुक्माकाका धनुष्यबाण घेतील. मीही ही तलवार घेत्ये. चल, वेळ नाही गमावता कामा.'
मुक्ताच्या वडिलांच्या पाया पडून विजय निघाला. रुक्मा व मुक्ताही निघाली. गावाबाहेर पडून जंगलात घुसली. आता पहाट झाली होती. दिशा उजळू लागल्या. तो ग्रामणीला कोणी तरी बातमी दिली की, विजय पळून जात आहे. जंगलातून जात आहे.
ग्रामणी उलटला. हत्यारी सैनिक घेऊन निघाला. त्याने बरोबर शिकारी कुत्राही घेतला. रक्ताचा वास घेत कुत्रा जातो. तो रस्ता शोधतो. माणसाला हुडकून काढतो. जंगलात घुसलेले लोक आरडा-ओरड करू लागले. विजय, मुक्ता व रुक्मा यांच्या कानावर तो गदारोळ आला. तिघे भराभर जात होती. आता चांगलाच दिवस उजाडला. पक्षी उडू लागले.
'विजय, मी या झाडाच्या आड उभा राहातो आणि जे येतील त्यांच्यावर बाण सोडतो. माझा बाण चुकणार नाही. तू त्या बाजूस जा. त्यांनी दोन तुकडया केल्या आहेत. तलवार घेऊन तिकडे तू उभा राहा. मुक्ता, तू विजयच्या जवळ राहा, म्हणजे त्याला स्फूर्ती येईल.' रुक्माने सल्ला दिला.
त्याप्रमाणे ते तयारीने राहिले. ग्रामणीची माणसे येत होती. तो पाहा बाण सुटला. पडला एक. पुन्हा बाण, दुसरा पडला. तिसरा बाण, तिसरा पडला. हाहा:कार उडाला; परंतु तिकडे काय? तिकडे विजयनेही एकाला पाडले. दुसरे दोघे धावले. विजयच्या पायावर वार बसला; परंतु मुक्ताने वार करणार्याचे मुंडके उडवले. ग्रामणीचे भाडोत्री लोक घाबरले, पळाले; परंतु ग्रामणी निवडक लोक घेऊन पाठीमागून येत होता. मुक्ताने पटकन पदर फाडून विजयची जखम बांधली आणि विजयच्या रक्ताच्यापाठोपाठ कुत्रा येऊ नये म्हणून तलवारीने स्वतःचा पाय कापून घेतला. तिने आपले रक्त सांडले.
'विजय, तू तिकडे जा. मी इकडून येते.' ती म्हणाली. हेतू हा की, कुत्रा आपल्या रक्ताच्या वासाने यावा. पायाचे रक्त गळत होते. तो पाहा ग्रामणी व त्याचा कुत्रा. ते पाहा आणखी हत्यारबंद लोक आले; परंतु रुक्माने बाण मारून कुत्रा ठार केला. भराभर त्याचे बाण येऊ लागले. ग्रामणी घाबरला.
'तो विजय परदेशात जात असावा. परागंदा झाल्यावर तो माझे काय करणार आहे? कशाला उगीच त्रास घ्या.' असे मनात ठरवून तो उरलेल्यांस म्हणला,