'येथून थोडया अंतरावर अंबाबाईचे एक मंदिर आहे. तेथे तुमचे दोघांचे लग्न लावू. चार प्रतिष्ठित लोक बोलावू. उपाध्याय बोलावू.' रुक्मा म्हणाला.

'परंतु विजयच्या गावच्या ग्रामणीला आणि त्याच्या वडिलांना आधी कळता कामा नये.' मुक्ता म्हणाली.

'नाही कळणार.'

ती फिरत फिरत शेवटी घरी आली. थोडया वेळाने विजय आपल्या गावाला निघून गेला.

विजयचे वडील बलदेव परगावी गेले होते. लौकर येणार नव्हते. ही संधी बरी असे विजय व मुक्ता यांना वाटले. रुक्माकाकाने सर्व व्यवस्था केली. गाडीत बसून मुक्ता, तिचे वडील व रुक्मा जगदंबेच्या मंदिरात आली. तेथे दुसरेही दोन सदगृहस्थ होते. एक उपाध्याय होता आणि विजयही आला. जगन्मातेसमोर विधिपुरस्सर सुटसुटीतपणे विवाह लागला. मुक्ता व विजय यांनी एकमेकांस माळा घातल्या. आनंद झाला.

विजय चार दिवस मुक्ताच्याच घरी राहिला. सारे नीट पार पडले, असे वाटले. एके दिवशी विजय आपल्या घरी जायला निघाला. त्याच्या घरी ही वार्ता गेलीच होती. तो वाटेत होता तोच त्याच्या गावचा ग्रामीण आला. त्याच्याबरोबर हत्यारी शिपाई होते. विजयला अटक करण्यात आली. ग्रामणीने त्याला गावाबाहेरच्या एका भीषण कारागृहात टाकले.

'का मला अटक? माझा अपराध काय? विजयने विचारले.'

'तुझ्या पित्याने तुझ्यावर नजर ठेवण्यासाठी मला सांगितले होते. तू पित्याच्या इच्छेविरुध्द लग्न लावले आहेस. पित्याची आज्ञा मोडली आहेस. पिता येईपर्यंत मी तुला तुरुंगात ठेवणार. तो आल्यावर काय ते पाहू. पड आता या अंधारकोठडीत.'

'मी अन्नाला शिवणार नाही.'

'बरेच झाले. सुंठीवाचून खोकला गेला.'

असे म्हणून तो ग्रामीण गेला. विजय दुःखी झाला. तो आपल्या खोलीचे निरीक्षण करू लागला. खोलीच्या भिंती उंच होत्या. एक उंच बिनगजांची खिडकी होती. त्या खोलीत एक उंच पेटारा होता त्या पेटार्‍यावर तो उभा राहिला, उभा राहून त्याने वर उचं उडी घेतली व खिडकी धरली. त्याने खिडकीतून खाली पाहिले, तो खोल दरी होती. त्या खिडकीतून कसे पळता येणार? खाली उडी कशी घेता येईल? सुटकेचा मार्ग नाही. तो निराश झाला.

विजयच्या अटकेची वार्ता मुक्ताला कळली. ती घाबरली. तो ग्रामणी विजयवर सूड घेणार असे तिला वाटले. ती रडू लागली.

'रुक्माकाका, तूच उपाय सांग.' ती रडू लागली.

'बारीक दोरी व जाड दोरी आण.' तो म्हणाला. तिने दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel