'विजय गुदमरला नाहीस ना?' तिने विचारले.
'नाही. भोक आहे मोठे पेटार्याला.' तो म्हणाला.
पुन्हा सारी झोपली. घोडेस्वारांनी ग्रामणीस विजय तेथे नाही अशी बातमी दिली. तो संतापला. मी स्वतः येतो. त्या घरातच तो असला पाहिजे. पुन्हा सारे परतले.
पुन्हा कठीण प्रसंग. विजय पुन्हा पेटार्यात शिरला. वरून नीट अंथरूण करण्यात आले. ग्रामणी आला. त्याने शोध शोधले; परंतु विजय नाही. बराच वेळ बसून निराश होऊन तो निघाला. मुक्ता तळमळत होती. विजय गुदमरेल अशी तिला भीती वाटत होती. ग्रामणी माघारा वळताच तिने अंथरूण दूर केले. पेटारा उघडला, तो विजय निश्चल! हालचाल नाही. तिने किंकाळी फोडली. ती त्या ग्रामणीने ऐकली. काही तरी भानगड आहे असे त्याला वाटले. त्याने एकाला चौकशी करायला पाठवले. तो एकदम घरात आला, तो तेथे विजय मूर्च्छीत पडलेला. रुक्मा त्याला सावध करीत होता. मुक्ता वारा घालीत होती.
'माझ्या पतीचे प्राण वाचवा. मला मुलगी माना. विजयचा काय आहे अपराध? आम्ही विधीने लग्न लावले आहे. माझी कीव करा.' ती त्या दूताच्या पाया पडून म्हणाली.
'मुली, निश्चिंत राहा; परंतु विजय सावध झाल्यावर त्याला येथे ठेवू नका. कोठे तरी दूर देशाबाहेर जाऊ दे.' असे म्हणून तो गेला.
'काय होती भानगड?' ग्रामणीने विचारले.
'ती मुलगी दुःखाने बेशुध्द होऊन पडली. गरीब बिचारी.' तो करुणेने म्हणाला.
ते सारे जाऊ लागले. विजय इकडे सावध झाला. मुक्ताच्या प्राणात प्राण आले.
'विजय बरे वाटते ना?' तिने विचारले.
'तू जवळ आलीस म्हणजे का बरे वाटणार नाही?'