तो असा विषण्ण व उदासीन होऊन जात होता, तो एकदम त्याला दूर ती मुलगी दिसली. ढगाआड असलेला चंद्र दिसावा तसे त्याला वाटले. तो धावत आला. त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला.

'तुमची किती वाट पाहायची? शेवटी आम्ही निघालो. म्हटले, राजाने ज्यांचा सन्मान केला ते आमच्याबरोबर कशाला येतील? आम्ही गरीब. सामान्य माणसे.' ती मुलगी म्हणाली.

'परंतु मी तुम्हाला राजाकडून मी येईपर्यंत थांबा असे नव्हते का सांगितले? मी तेथे आलो तो कोणी नाही.'

'परंतु एकाजवळ तुमच्यासाठी तेथे पत्ता देऊन ठेवला होता. तुम्ही याल म्हणून घरी रसोई करून ठेवली होती; परंतु तुमचा पत्ता नाही. दोन दिवस वाट पाहून शेवटी आम्ही निघालो.' ती म्हणाली.

'परंतु तेथे कोणीही मला पत्ता दिला नाही. तेथे कोणी नव्हते. एक मनुष्य मात्र दारू पिऊन तर्र होऊन पडला होता. मी शहरात सर्वत्र तुम्हाला पाहात होतो. शेवटी निराश होऊन मी निघालो. राजाने माझी लौकर सुटका करावी म्हणून मी तडफडत होतो. त्याच्या मुलीने गाणे ऐकायला बसवले. माझे सारे लक्ष तुमच्याकडे होते. तुम्हाला कसे पटवू? तुम्ही गरीब, तसा मीही गरीबच आहे.

'तुम्हाला वाईट वाटले वाटते?' तिने हळुवारपणे विचारले.

'परंतु आता सारी भेटलो. छान. गैरसमज गेले. आपण आता हसत खेळत जाऊ. चर्चा करीत जाऊ. धरा माझा हात.' म्हातारा म्हणाला.

ती तिघे आनंदाने जात होती. पुन्हा एके दिवशी टापटाप घोडयांचा आवाज आला. कोण येत होते? तो ग्रामाधिकारी. त्या ग्रामाधिकर्‍याने या तिघांना पुन्हा आज एकत्र जाताना पाहिले. त्याच्या कपाळाला आठया पडल्या.

'पुन्हा तिच्याबरोबर! विजय, हे बरे नाही. सोड हे छंद, तुझ्या पित्याचा संकल्प ध्यानात ठेव. तुला यती व्हायचे आहे, पती नाही.' असे  म्हणत तो दौडत गेला.

'काय बडबडला तो?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel