'हा येथे बिछाना आहे. येथे वारा फार छान येतो. बसा. लवकरच ताट पाठवतो.' असे म्हणून तो मनुष्य गेला. तेथे एक खिडकी होती. खिडकीच्या समोर एक प्रचंड पवनचक्की होती. पवनचक्की हात जवळजवळ खिडकीपर्यंत आले होते. किती खोल होते खाली!
इतक्यात एका माणसाने जेवण आणून दिले. बाहेर चंद्र उगवला होता. खिडकीतून सुंदर चांदणे आत आले. विजय आता अंथरुणावर पडला. तो हे काय? असे काय अंथरूण? अंथरूण कशावर आहे? खाली पोकळी आहे की काय? तो घाबरून उठला. बारीक कामटयांवर ते अंथरूण पसरलेले होते. त्याने बाजूला होऊन खाली हात घातला तो पोकळी! खड्डा आहे की काय? किती खोल आहे? त्याने बाजूचा एक दगड उकरून खाली टाकला, तो डुब् आवाज झाला. अरे बापरे, विहरीर! खोल विहीर आहे. त्या विहिरीवर आपले अंथरूण आहे. रात्री झोपेत या कामटया वजन सह न होऊन मोडल्या असत्या व आपण विहिरीत पडलो असतो! विजय घाबरला. भ्याला. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. ही खाणावळ नाही तर! हे चोर आहेत. प्रवाशांना लुटणारे चोर. प्रवाशांना विहिरीत पाडून त्यांचे सारे लुटणारे चोर. आता सुटका कशी व्हायची? येथून जिन्याने खाली नाहीच जाता येणार? ते अडवतील. मग?
तो उठला. तो हळूच खाली गेला. मधली सारी दारे बंद करून तो पुन्हा वर आला आणि खिडकीजवळ आला. त्याच्या बिछान्याखाली पेंढा होता. त्याने पेंढयाची दोरी वळली. पिण्यासाठी पाणी तेथे होते. पाण्यात भिजवून त्याने वेठण तायर केले. मजबूत वेठण. त्याने ते खिडकीला बांधले. दुहेरी करून बांधले आणि काय करणार? ती दोरी तुटली तर? आयुष्याची दोरी बळकट असली तर जगू. नाही तरी येथे आता मरण आहेच. त्याने ती दोरी धरली. तो बाहेर उतरला. तो लोंबकळत राहिला. दोरी जमिनीपर्यंत थोडीच होती? त्या पवनचक्कीचा हात पकडायचा असा त्याचा बेत होता. त्याने दोरीचा एक हात धैर्याने सोडला आणि त्या हाताने पवनचक्की धरली. चक्की बळकट धरून त्याने दोरीचा हात सोडला; परंतु इतक्यात हात सुटला! अरेरे! धाडकन् तो खाली पडला! परंतु तो गवतावर पडला. त्या पवनचक्कीच्या खाली गवत साठवलेले होते. त्या गवतावर अलगद तो पडला. त्याला लागले नाही. जणू देवाने वाचवले.
त्याच्या डोक्यात आता एक विचार आला. त्याने ते गवत त्या इमारतीभोवती चोहोबाजूला पसरून त्याला आग लावून दिली. त्याच्याजवळ चकमक होतीच. ते वाळलेले गवत एकदम पेटले. विजय दूर जाऊन उभा राहिला.
वरचा प्रवास अजून विहिरीत कसा पडत नाही, अजून आवाज कसा होत नाही याची वाट ते चोर पाहात होते. ते आपल्या हत्यारांना धार लावीत होते; परंतु सभोवती आग पेटत होती याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्या इमारतीच्या तळमजल्यात तेल, राळ वगैरे ज्वालाग्राही पदार्थ होते. त्यांनी पेट घेतला. प्रचंड आवाज झाला. आता आग गहिरीच भडकली. ज्वाळा उंच जाऊ लागल्या. सर्वत्र प्रकाश पसरला. ते चोर घाबरले. ते वर जाऊ लागले. तो दारे आतून बंद. त्यांनी दारे फोडली. ते अगदी वरच्या मजल्यावर आले. तो मुशाफिर तेथे नाही! त्यांनी खिडकीतून पाहिले तो, प्रवासी खालून हसत होता.