माईजींनी कनोजच्या राजाला ही सर्व हकीगत लिहून कळवली आणि राजाला आग्रहाने राजगृहाला लिहून, तेथील मठातील महंतांस ही हकीगत कळवून सेवानंदास संसारात शिरण्याची परवानगी पुन्हा मिळेल, असे करण्याविषयी कळकळीने त्या पत्रात प्रार्थिले होते. ती सर्व हकीगत वाचून राजाही द्रवला. त्याच्या कन्येलाही वाईट वाटले.
राजाने राजगृहाच्या महाराजांस लिहिले. तेथील महाराजही चकित झाले. त्यांनी मठाधिपतींस बोलावून सर्व हकीगत निवेदिली. मठाधिपतींनी विचार करून उत्तर दिले, 'मी संसारात शिरण्याची अनुज्ञा देतो. भगवंताची लीला.'
पुन्हा एकदा त्या नवीन बुध्दमंदिरात भव्य सभा भरली. शेकडो स्त्रीपुरुष आले होते. सेवानंदाने सारी वार्ता सांगितली आणि शेवटी ते अनुज्ञापत्र वाचून दाखवले,
सेवानंद यांस सप्रेम प्रणाम.
सर्व वार्ता समजली. तुम्ही पुन्हा संसारात प्रवेश करणेच इष्ट. तुम्ही संसारच परमार्थमय कराल, यात शंका नाही. तुमचे विजय नाव सार्थ आहे. तुम्ही संसारातही विजय व्हाल. संसारात राहूनही तुम्ही कमलपुष्पाप्रमाणे पवित्र राहाला. तुम्ही संसारास शोभा आणाल. एक गोष्ट ध्यानात धरा. कधी निराश नका होऊ. आशावंत व आनंदी राहून आसमंतात आशा व आनंद निर्माण करा. हेच धर्माचे सार. ते संसारात राहून करा व संसाराच्या बाहेर राहून करा. अधिक काय लिहू? तुमच्या मुक्तास सप्रेम आशीर्वाद. पूज्य माईजींस प्रणाम. मठवासीयांस सप्रेम प्रणाम.
''महंत''
असे ते पत्र वाचून दाखवल्यावर सेवानंदाने किती तरी वेळ भाषण केले. सर्वांच्या भावना उचंबळल्या होत्या. शेवटी तो म्हणाला.
'मित्रांनो, मी तुमचा विजय म्हणून पुन्हा तुमच्यात येत आहे. विजय या नावाने वावरूनच जो सेवेचा आनंद लुटता येईल, तो मी लुटीन; आपण आपले गाव आदर्श करू या. भेदभाव दूर करू या. प्रेमाचा पाऊस पाडू या. कोणी दुःखी नको, निराश नको. उपाशी नको, अज्ञानी नको. आनंद पिकवू. आपल्या गावाचे नाव शिरसमणी. खरोखरच सर्व गावांच्या शिरोभागी शोभेल असा आपला गाव करू. या विजयला पदरात घ्या. सर्वांना प्रणाम, प्रणाम.'
असे म्हणून सेवानंदाचा विजय होऊन तो लोकांत मिसळला. मुक्ता एकदम त्याच्याजवळ आली. विजयने तिज्याजवळचा शशिकांत ओढून घेतला व त्याचे अगणित मुके घेतले.