मुक्ताला ते पहिले पत्र मिळाले होते. ते पत्र घेऊन विजयच्या घरी ती गेली होती. विजयच्या बापाचा राग आता कमी झाला होता. विजय केव्हा घरी येईल असे त्यास झाले होते. मुक्ताने ते पत्र वाचून दाखविले. मुलावर आलेले कठीण प्रसंग ऐकून मायबापांच्या डोळयांत पाणी आले. मंजुळा मुसमुसू लागली.
'केव्हा येईल विजय परत?' मंजुळेने विचारले.
'रुक्माकाकने राजाकडून क्षमापत्र आणले आहे. राजाला सारी खरी हकीगत रुक्माने सांगितली. त्याने ग्रामपतीलाही खरमरीत पत्र पाठवले आहे, असे कळले. आता विजय राजगृहाला गेला की, पुन्हा पत्र पाठवील. तेथे तो मुक्काम करणार आहे. तेथे आपण पत्र पाठवू व परत ये, भीती नाही, असे कळवू. विजय येईल परत. सर्व काही गोड होईल.' मुक्ता म्हणाली.
'आणि तू सुध्दा जप प्रकृतीला. पायी कशाला आलीस? तुझे दिवस भरत आलेले. तू आमच्याकडेच बाळंतपणास येतीस तर आम्हाला समाधान झाले असते. विजयच्या बाबतीत मी जो अन्याय केला त्याचे थोडे परिमार्जन झाले असते.' बलदेव म्हणाला. 'परंतु बाबा नको म्हणतात. विजय आला म्हणजे सारी एकत्र राहू.' ती म्हणाली.
पुढे मुक्ता प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. रुक्मा व तिचे वडील तिची काळजी घेत. रुक्माने डिंक कुटून तिला लाडू करून दिले. मंजुळेनेही आईकडून आळिवाचे लाडू पाठविले. सासूसासरे येऊन बाळ पाहून गेले. सुंदर बाळ.
रुक्मा त्या बाळाला आंदुळी. गाणी व पोवाडे म्हणे. बाळाचे नाव शशिकांत ठेवण्यात आले. मुक्ता विजयच्या पत्राची वाट पाहात होती. बाळाची बातमी केव्हा एकदा विजयला पाठवू, असे तिला झाले होते. ती बाळाला जवळ घेई व म्हणे, 'कोठे आहेत तुझे बाबा? लौकर येऊ देत हो घरी. मग ते तुला घेतील. मी नाही मग घेणार.'
एके दिवशी विजयचे ते दुसरे पत्र आले. मुक्ताने ते वाचले. त्या चोरांची हकीगत वाचताना तिच्या अंगावर काटा उभा राहिला आणि ते वादळ! किती एकेक जिवावरचे प्रसंग. तिचे डोळे ते पत्र वाचताना शंभरदा भरून आले; परंतु शेवटी तिला आशा आली. तिने बाळाचे मटामट मुके घेतले. 'आता पाठवत्ये हो पत्र त्यांना, बोलावते विजयला. तुझे बाबा येतील हो राजा.' असे म्हणून तिने बाळाला पोटाशी घट्ट धरले.