'तुमच्या विजयविषयी सांगायला आलो होतो. विजयला भिक्षू ना करायचे आहे? यतिधर्म ना तो घेणार आहे? धर्मासाठी त्याला अर्पण करावयाचे असा ना बलदेवांचा संकल्प आहे?' त्याने विचारले.

'हो. धर्मासाठी त्याला देऊ. सर्वांचा मग तो उध्दार करील.' माता म्हणाली.

'कसला उध्दार! तुम्हाला तो नरकात घालील. अहो, राजधानीत जाताना व येताना एका मुलीबरोबर तो होता. हसत काय, खेळत काय! लक्षणे बरी नव्हेत. जपा. तुमच्या तोंडाला तो काळिमा फाशील. तो तरुण आहे. ताबडतोब त्याला दीक्षा द्या. यती तरी करा नाही तर लग्न लावून पती करा; परंतु हे चाळे नकोत.'

'हे तुम्ही काय बोलता?' मंजुळा म्हणाली.

'जे डोळयांनी पाहिले ते.' तो म्हणाला.

'विजय असा नाही. हे पाहा भगवान बुध्दांच्या चरित्रातील चित्र. यशोधरेचे चित्र असावे. पाहा कसे सुंदर आहे. जणू देवता.' मंजुळा म्हणाली.

'अहो, हे चित्र यशोधरचे नाही. हे त्या मुलीचे चित्र! अशीच ती आहे. विजय तुम्हाला फसवीत आहे. ही विजयची देवता आहे, प्रेमदेवता!' तो उपहासाने हसत म्हणाला. इतक्यात बलदेव आले.

'काय ग्रामपती?'

'बलदेव, विजयला जरा आवरा. त्याचे कान उपटा. आधीच लांब आहेत ते आणखी लांब व्हायला लागले. गध्देपंचविशी जवळ येत आहे. तुम्ही विजयला धर्माच्या कामासाठी देणार ना? त्याला यती करणार ना?'

'हो. माझा तो संकल्प जगजाहीर आहे.'

'परंतु विजय तर ही असली चित्रे काढीत आहे.'

'कोणाचे हे चित्र?'

'बाबा, हे भगवान बुध्दांच्या यशोधरेचे चित्र आहे. तुम्हाला नाही वाटत?' मंजुळा म्हणाली.

'अहो, हे एका मुलीचे चित्र आहे, जिच्याबरोबर थट्टामस्करी करीत विजय राजधानीस जात होता व परत येत होता.' ग्रामपती म्हणाला.आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel