'हे बघ. असा असा तो तरुण आहे. दिसतो तो मदनासारखा. त्याचे कान जरा लांबट आहेत. सार्या राजधानीत तो उमटून पडेल असाच आहे. त्याला हुडकून काढ व त्याला या जगातून नाहीसा कर. त्याच्या सुंदर झुलपांची मला खूण आणून दे. जा. एक पळभरही त्याला या जगात ठेवू नको.' असे तिने त्या मारेकर्यास सांगितले. मारेकरी प्रणाम करून गेला. सुलोचना रडली.
'माझ्या प्रियकराला का मी मारावे? परंतु मी मारीत नाही. त्याला तारीत आहे. विजय चिखलात न पडो. तो निर्मळ निष्कलंक राहो. विजयला वाचवण्यासाठी मी मारीत आहे. त्याचा आत्मा पडू नये म्हणून हे करीत आहे. विजय, माझे प्रेम झिडकारून तू चिखलात रे का बुडया मारीत आहेस? तू माझे प्रेम अव्हेरलेस, परंतु मी तुझीच पूजा करीत आहे. तुला मी पडू देणार नाही. विजय, क्षमा कर. मारेकर्याचा प्रहार ते माझे प्रेम समज.' असे सुलोचना मनात म्हणत होती. रडत होती.
त्या दिवशी रात्री अंधार होता. विजय निराशेच्या अंधारात होता. तो नदीतीराकडे जात होता. त्याच्या पाठोपाठ तो पाहा मारेकरी येत आहे. इतक्यात आकाशात ढग जमा झाले. कडाड्कडाड् गर्जना होऊ लागल्या. मुसळधार पाऊस पडू लागला. मध्येच कानठळया बसवणारा कडकडाट होई व लख्खकन् वीज चमके. 'पड, माझ्या डोक्यावर तरी पड' विजय थांबला. वीज वर चमकली, त्या माणसाच्या हातातील हत्यार विजयला दिसले वाटते! 'कोण? तो का कोणी खुनी येत आहे? माझ्या पाठीस मरण का लागले आहे? मुक्ताचा बळी घेऊन माझ्या का आता पाठीस आले? कठोर मरणा, तुझ्याशी ही शेवटची झुंज घेऊ दे. मी आपखुषीने मरेन, परंतु मारणार्याकडून मरणार नाही. ये मारेकर्या ये. मी आपण होऊन मरेन, परंतु तुझ्या हातात सापडणार नाही.' असे म्हणून विजय पळत सुटला. पाठोपाठ तो मारेकरीही येत आहे. दोघे नदीतीरी आले. नदी घो घो करीत चालली होती. प्रचंड पूर आला होता. विजयने पुरात उडी घेतली. त्या मारेकर्यानेही उडी घेतली. तो मारेकरी झपझप जवळ येत आहे. विजयची शक्ती कोठे गेली? मुक्ता गेल्यामुळे त्याची शक्ती क्षीण झाली का? मारेकरी नजीक आला. त्याने विजयची झुलपे पकडली. त्याने हत्यार काढले; परंतु विजय निसटला. झुलपेच फक्त दोन कान कापली गेली. ती झुलेप कमरेला खोवून तो मारेकरी पुन्हा मगराप्रमाणे पाठीस लागला.
'मारेकर्या, तू मला का मारीत आहेस? काय मी पाप केले? अरे, अनेकांचे प्राण मी वाचवले. मी कोणाचे वाईट केले नाही. याच नदीत एकदा तुफानात गलबत उलटले. मी अनेकांचे प्राण वाचविले. एक बाई, तिचे मूल यांचे प्राण मी वाचविले; परंतु देव माझ्या का असा पाठीस? मला जगायची इच्छा नाही; परंतु असे अघोरी मरण मला नको. मारेकर्या, तुझा खंजीर मला दे. मी माझ्या हाताने माझे प्राण घेतो; परंतु तुझा घाव नको.'