अनंता, तुझे गोल, तारे तुझे,

तुझें रूप ब्रह्मांड सारें तुझें,

तुझी ही कृती रे मनोमोहना,

अहोरात्र गाई तुझ्या गायना.

तया मूक गानें मना मोहिलें,

जगन्नायका, वेड कीं लाविलें;

नुरे भान, मी स्वाधिकारा भुलें;

भरूं लागलो सूर वेडे खुळे.

मदीं त्या तुझें रूप गाऊं धजें,

स्वयंदीपका दीप दावूं सजें;

न द्यावा जिथे पाय तेथे दिला,

बहू लाजलों भान येतां मला

तुझे लाडके रे, तुझे लाल जे

वृथा स्पर्धण्या त्यांसवें मी धजे;

करोनी दया रे दयासागरा,

क्षमस्व प्रभो, या तुझ्या लेकरा.

अहो भाग्य माझें जरी या सुरीं

सहस्त्रांश त्या गीतिची माधुरीं !

तरी हे त्वदंघ्रीं समर्पी हरी !

रुचो हे तुला स्तोत्र, घे आवरीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel