आईबाप

देशबंधूंच्या पित्याचे नाव भुवनमोहन. ते कलकत्त्यातील एक सुप्रसिध्द अ‍ॅटर्नी होते. ऍटर्नी म्हणजे दुसर्‍या ची सर्व कायदेशीर कामे चालवणारा, त्यांचा प्रतिनिधी होऊन सारे बघणारा-वकील. भुवनमोहनही अति उदार होते. त्यांच्या उदारपणास सीमा नव्हती. जे जवळ असेल ते देत. निर्भय व सत्यप्रेमी होते ते. देशाविषयीही त्यांना फार वाटे. हिंदुधर्मातील रूढींचा त्यांना राग येई. श्रेष्ठ-कनिष्ठपणाचा तिटकारा वाटे. हिंदुधर्माचे उज्ज्वल स्वरूप निर्माण करू पाहणार्‍या  अ‍ॅब्राह्मोसमाजाचे ते सभासद झाले.
परंतु देशबंधूंची आई जुन्या वैष्णवपंथाचीच होती. वैष्णवधर्माची ती गोड गाणी गाई. निर्गुण-निराकार परब्रह्माची उपासना तिला मानवेना. भक्तिप्रेमाचा, देवाजवळ रुसण्या-रागावण्याचा गोड वैष्णवधर्म, भागवतधर्म तिला आवडे. देशबंधूंची आई फारच माशील होती. तिचे हृदय अति कोमल होते. कोणाचेही दुःख तिला पाहवत नसे. तिचे डोळे दुसर्‍या विषियीच्या करुणेने सदैव भरलेले असत. आणि दुसर्‍या चे दुःख दूर करूनच ते हसत. त्यांच्या घरात एक दूरचा नातलग राहत होता. तो फुकट जेवे. एवढेच नाही तर दारू पिऊन येई. दारूच्या नशेत देशबंधूंच्या आईला तो शिव्या देई. भुवनमोहनांना एके दिवशी या गोष्टीचा राग आला.
''याला हाकलून देतो. नको आपल्या घरात.'' ते म्हणाले.

''परंतु बिचारा जाईल कोठे? आणि शुध्दीवर आले म्हणजे त्यांनाही जरा वाईट वाटते. राहू दे. नका घालवू.'' ती माऊली म्हणाली.

जन्म

अशा कुटुंबात देशबंधू जन्मले. ज्या कुळात औदार्य, दया, क्षमा इत्यादि गुण पिढयानढया संचित होत आले होते अशा थोर कुळात देशबंधू जन्मले. रडणार्‍यांबरोबर रडणारे, दुःखितांना पाहून दुःखी होणारे अशांच्या पवित्र, पावन कुळात देशबंधू जन्मले. १८७० च्या नोव्हेंबर महिन्याच्या पाचव्या तरखेस देशबंधूंचा जन्म झाला. त्या वेळेस कलकत्त्यातील भवानीपूर भागात त्यांचे वडील राहत असत. देशबंधूंचे नाव चित्तरंजन असे होते.

लहानपणचे भविष्य

रवींद्रनाथांचेही घराणे कलकत्त्यास होते. एकदा लहान चित्तरंजनास घेऊन त्याची आत्या रवींद्रनाथांच्या घरी गेली होती. तेथे बायका गोष्टी बोलत बसल्या होत्या. तेथली एक वृध्द आजी चित्तरंजनांची तेजस्वी बालमूर्ती पाहून म्हणाली, ''हा मुलगा पुढे कोणीतरी मोठा पुरुष होईल.'' आणि त्यांची जी पत्रिका करण्यात आली तिच्यात हा मुलगा पुढे संन्यासी होईल असे होते.

विद्यार्थीदशा

१८८६ मध्ये प्रवेश परीक्षा पास होऊन ते प्रेसिडेन्सी कॉलेजात गेले.  त्यांची वक्तृत्वकला लहानपणापासूनच दिसून येऊ लागली. शाळेत असल्यापासूनच ते सभोवती मुले जमवायचे, चर्चा करायचे, वाद करावयाचे, त्यांचे गुरुजन म्हणत, 'हा पुढे मोठा वक्ता होईल.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel