हे तरुण हीच माझी शक्ति

एकदा देशबंधू बसले होते. त्यांच्याजवळ काही तरुण कार्यकर्ते बसले होते. आलेले एक परप्रांतीय पाहुणे म्हणाले, ''देशबंधू, तुम्ही जे जे काम हाती घेता ते यशस्वी करता? कोठून आणता ही शक्ति?'' जवळच्या कार्यकर्त्यांकडे बोट करून देशबंधू म्हणाले, ''माझी शक्ति म्हणजे ही माझी कष्टाळू माणसे. जिवापाड काम करणारी त्यागी माणसे.'' देशबंधू जणू सहस्त्रबाहू होते. हजारो माणसे त्यांचे काम करायला तयार असत. त्यांचा शब्द झेलायला तयार असत. ज्याने सांगितलेले काम करावयास अशी शेकडो माणसे जवळ आहेत, असा देशबंधूंशिवाय दुसरा कोण पुढारी होता? परंतु ही कार्यकर्त्यांची शक्ति देशबंधूंनी कशी मिळविली? आपल्या प्रेमाने, उदारपणाने, सहानुभूतीने!

त्यांच्या देशभक्तिस तुलना नाही

स्वामी विवेकानंद, ब्रह्मबांधव उपाध्याय व देशबंधू यांच्या देशभक्तिस तुलना नाही, असे बंगालमध्ये म्हणतात. देशबंधूंची देशभक्ति म्हणजे एक महाकाव्य आहे. देशबंधूंनी पूर्वी काव्ये लिहिली. ती त्यांची प्रतिभा पुढे का मेली? ते काव्य का लोपले? ती बासरी का बंद पडली? नाही. त्यांच्या त्या बासरीनेच त्यांना कर्मवीर बनविले. त्यांच्या कवीवृत्तीने त्यांना वीरवृत्ती दिली. देशबंधूंच्या काव्यप्रतिभेला आलेले सुंदर फळ म्हणजे त्यांची देशक्ति काव्यमय वाटते. तिच्यात मधुरता आहे. कवीच्या हृदयात भावनांच्या लाटा उसळतात, तशा देशबंधूंच्या देशभक्तित, त्यांच्या त्यागात मोठमोठया लाटा दिसतात. आज हे सोडले, उद्या ते सोडले, अशी देशभक्तिची प्रतिभा दिवसेंदिवस पल्लवीत होताना दिसते. देशाला त्यांनी अक्षरश: तन-मन-धन दिले.

आशुतोष मेले? खरे का हे?

आशुतोष मुकर्जी हे कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती. असहकाराच्या काळात देशबंधूंचे व त्यांचे खटके उडत. परंतु देशबंधुंच्या मनात आशुतोषांविषयी अत्यंत आदर होता.

''एक कोटी रुपये मला द्या. सारे कलकत्ता विद्यापीठ मी राष्ट्रीय करतो.'' आशुतोष देशबंधूंना म्हणाले.

''मी देतो एक कोट रुपये आणून,'' देशबंधू आव्हान स्वीकारून म्हणाले.

परंतु देशबंधूना किती कामे! आणि तो तुरुंगावास. ती गोष्ट तेवढीच राहिली. देशबंधू जेव्हा जुहूला होते, महात्माजींजवळ स्वराज्य पक्षाची चर्चा करीत होते, त्या वेळेस आशुतोष अकस्मात् एकदम मरण पावले. आशुतोषांची मृत्यूवार्ता वाचून देशबंधू स्तंभित झाले. ते कोणाशी बोलले नाहीत. एकटेच फेर्‍या घालीत होते. आणि मध्येच म्हणत, ''आशुतोष खरचे का मेले? कसे एकदम गेले?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel