भावा-बहिणींवर अपार प्रेम
चित्तरंजनांचे आपल्या बहिणभावांवर फार प्रेम होते. त्यांनी त्यांचे शिक्षण केले. एक भाऊ प्रफुल्लरंजन हे पुढे हायकोर्टाचे जज्ज झाले होते. सर्वात लहान भाऊ वसंतरंजन हाही बॅरिस्टर होऊन आला होता. कलकत्त्यास तो बॅरिस्टरी सुरू करणार इतक्यात तो आजारी पडला. दार्जिलिंग येथे तो अल्पवयात मरण पावला. चित्तरंजनांस फार दुःख झाले. त्यांना तीन बहिणी. सर्वात मोठी बहिण विधवा होती. ती व तिची मुले चित्तरंजनांजवळ असत. दुसरी एक बहिण उर्मिलादेवी. तीही गतधवा झाली. तिने पुढे राष्ट्रसेवेस वाहून घेतले. मुलींची राष्ट्रीय शाळा ती चालवी. तिसरी बहिण अमलादेवी. अमलादेवीचा कंठ अती गोड होता. १९१७ मध्ये कलकत्त्यास काँग्रेस भरली. त्यावेळेस अमलादेवीने वंदेमातरम् गीत म्हटले होते. पुरुलिया येथे तिन एक अनाथाश्रम चालविला होता. आंधळे, लुळे, सर्वांना तेथे आश्रय मिळे. चौथी एक बहीण लहानपणीच वारली.
चित्तरंजनांना मुलगा एकच. त्याचे नाव चिररंजन.
असा हा संसार चालला होता. कसली ददात नव्हती. आनंद होता.
सुखी पतीपत्नी
वासंतीदेवीचे चित्तरंजनांवर अपार प्रेम. वाईट दिवस गेले होते. चिंता संपली होती. पतीच्या आवडीनिवडी जणू त्या स्वतःच्या मानीत. वासंतीदेवी प्रेमाने चित्तरंजनांना 'चित्त' अशी हाक मारीत. 'चित्त, आज कोणत्या रंगाचे लुगडे नेसू?' त्या विचारीत आणि चित्तरंजन सांगतील त्या रंगाचे त्या नेसत. त्यांच्या अन्योन्य प्रेमाला सीमा नव्हती.
हृदयातील खरी भूक
परंतु चित्तरंजन जरी ह्या बाह्मवैभवात होते, तरी त्यांची हृदयाची भूक दुसरीच होती. हृदयसागर आणखी कशासाठी तरी गर्जत होता. दुसरे कोणी तरी त्यांना हाक मारीत होते? कोण हाक मारीत होते? बंगालमध्ये चैतन्य म्हणून अति थोर संत होऊन गेले. चैतन्य म्हणजे मूर्तिमंत प्रेम. निळा समुद्र पाडून हा माझा घननीळ कृष्णच नाचत आहे असे त्यांना वाटे व बाहू उभारून ते समुद्रात घुसू बघत. दारुडयांनी मारून रक्तबंबाळ केले तरी चैतन्य म्हणायचे, 'त्यांनी मला मारले तरी मी त्यांना प्रेमच देणार.' चैतन्य महाप्रभु म्हणजे बंगालमधील वैष्णवधर्माचा प्राण. चैतन्यांना गौरांग असेही नाव आहे. चित्तरंजन म्हणायचे, 'बंगालला जाणायचे असेल तर चैतन्यांना जाणलेच पाहिजे.' बंगाली लोकांची भावनोत्कटता चैतन्यांचे चरित्र वाचू तर थोडी फार समजेल. चित्तरंजन चैतन्यांच्या चरित्रात डुंबत. चण्डीदासाची अति गोड अशी भक्तिमय गीते त्यात रमत. चैतन्यांचे जीवन व चंडीदासाची गीते यातून मला नवप्रेरणा मिळाली, नवचैतन्य मिळाले असे चित्तरंजन म्हणत.
ते कथा-कीर्तनात जावयाचे. हरिसंकीर्तन करावयाचे. एकदा श्रीरामकृष्णींची समाधी असलेल्या बेलूर मठात ते गेले होते. श्रीरामकृष्ण परमहंसांची पुण्यतिथी होती. कीर्तनाचा गजर चालला होता. चित्तरंजन तेथे रमले होते. परंतु दुसरीकडे खूप गर्दी होती? कशाची? तेथे प्रसाद वाटण्यात येत होता. चित्तरंजन तेथे आले. तेथे हिंदू होते, मुसलमान होते, अमेरिकन मिशनरीही होते. जातिवर्ण विरहित, धर्मभेदरहित असा तो प्रेममय मेळावा पाहून चित्तरंजनांचे हृदय उचंबळले.