सागर संगीत

मालंचानंतर 'माला', 'सागर संगीत', 'किशोर-किशोरी', 'अंतर्यामी' अशी सुंदर सुंदर काव्ये त्यांनी लिहिली. माला काव्यसंग्रहात प्रेमाच्या सुंदर कविता आहेत. परंतु त्यांचे सर्वात प्रसिध्द काव्य म्हणजे सागर संगीत. जणू स्वतःच्या हृदयातीलच अनंत भावनांचे संगीत ते ऐकत होते. ते वकील झाले होते. परंतु त्यांचे हृदय वकिलीसाठी नव्हते. कुटुंबाची प्रतिष्ठा पैसे मिळवून वाढवता यावी म्हणून ते वकील झाले होते. परंतु त्यांचे अंतरंग अन्यत्र होते. स्वतःच्या मनातील थोर थोर भावना वकिलीच्या  धंद्याखाली त्यांनी दडपून ठेवल्या होत्या. एखादी सुंदर शिक्षणसंस्था काढावी, ज्ञानप्रसार करावा, साहित्यसेवा करावी असे त्यांच्या मनात येई. परंतु या सर्व उर्मी. या भावनांच्या लाटा त्यांनी दडपून ठेवल्या होत्या. कुटुंबासाठी त्यांनी आपल्या आंतरिक आशा-आकांक्षाचे जणू बलिदान केले. त्यांचे वकील होणे म्हणजे अपरंपार त्याग होता. चित्तरंजनांनी पुढे अपास त्याग केला. पैसे दिले. स्वतःचे घर दिले. परंतु कुटुंबाची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी त्यांनी इतर भावना गुंडाळून वकिली हाती घेतली. या गोष्टीतील त्याग हा मूक त्याग सर्वात अधिक थोर होय.

चित्तरंजन सकाळी उठत व सागरतीरी जाऊन बसत. कलकत्त्यास समुद्र जवळ नाही. हुगळी नदी हा गंगेचा फाटा किंवा गंगेला मिळालेली नदी आहे. तिलाच गंगा म्हणतात. तिलाच सागर म्हणतात. समुद्राच्या भरतीचे पाणी येतेच. चित्तरंजन तेथे बसत. सूर्योदय होत असावा. आकाशात रंग पसरावा व खाली सागरतरंग नाचत असावेत, वारे वाहत असावेत व सागर-लीला सुरू असावी. तेथे सागराचे कधी शांत रूप दिसे, कधी उग्र. कधी चित्तरंजनांना तो सागर एखाद्या प्रेमी राजकुमाराप्रमाणे वाटे; तर कधी त्रिशूळधारी रुद्राप्रमाणे भासे. हृदयातील सारे भाव त्या सागर संगीतात ते ऐकत होते.

त्यांच्या हृदयतंद्रीला सागराचा स्पर्श होई आणि संगीत स्त्रवू लागे. समुद्र आपल्या लहरींच्या अंगुलींनी चित्तरंजनांची हृदयवीणा जणू वाजवी. सागर संगीतात महान् निसर्गपूजा आहे. अति सुंदर भाषा आहे. सृष्टीत जणू ते बुडाले आहेत.

ते सागराला विचारतात, 'या प्रभातकाळी तू काय म्हणतो आहेस, काय गातो आहेत? तुझे गीत सर्वत्र भरून राहिले आहे. काय त्याचा अर्थ? तू क्षणात कोमल स्वर काढतोस, क्षणात मेघगंभीर काढतोस? क्षणात तुझा सूर ऐकून डोळयांत अश्रू येतात तर दुसर्‍या च क्षणी मी उन्मत्त होऊन जणू वेडा बनतो. तुझे हे सूर ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. या अनंत तानांवर मी डोलत राहतो व समोरच्या प्रभातवेळेकडे शांतपणे पाहत राहतो.'

चित्तरंजन स्वतःच्या हृदयातील का सूर ऐकत होते? घरची करुण स्थिती पाहून का अश्रू येत होते? देशाची स्थिती पाहून का पुन्हा उन्मत होऊ पाहत होते? काय होते हे सारे? सागर संगीतात चित्तरंजनांचा हृदयसिंधू आहे. त्यांच्या हृदयाला भूक होती. कशाची? देशसेवेची? स्वातंत्र्याची? विश्वप्रेमाची? ती भूक शांत होईपर्यंत का हृदयसागर गर्जत राहणार होता?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel