पार्लमेंटच्या सभासदाचा निषेध

चित्तरंजन इंग्लंडात गेले. अभ्यासात रमले. परीक्षा झाली. परंतु त्याच वेळेस महर्षी दादाभाई नौरोजी इंग्लंडमध्ये पार्लमेंटात निवडून येण्यासाठी उभे राहिले होते. एक हिंदी मनुष्य पार्लमेंटात प्रतिनिधी म्हणून जाऊ पाहत होता. चित्तरंजन दादाभाईंसाठी प्रचार करू लागले. त्यांचे वक्तृत्व देशसेवेस धावून आले. देशसेवेचा तो पहिला धडा. दादाभाई निवडून आले. याच सुमारास पार्लमेंटच्या एका सभासदाने हिंदी जनतेविषयी काही अपमानास्पद उद्गार काढले होते. या सभासदाचे नाव मॅक्लिन साहेब. तो काय म्हणाला होता? 'हिंदू-मुसलमान हे आमचे गुलाम आहेत. आम्ही त्यांना तलवारीने जिंकून घेतले आहे.' इत्यादी उद्दाम भाषा त्या साहेबाने वापरली होती. हे शब्द ऐकून कोण दुःखी झाला? कोणाचे हृदय पेटले? चित्तरंजनांचे चित्त संतप्त झाले. त्यांनी हिंदी लोकांची सभा भरविली. त्या सभेत अत्यंत तेजस्वी असे त्यांनी भाषण केले. मॅक्लिनसाहेबाचा त्यांनी निषेध केला. उदारमतवादी ग्लॅडस्टन या वेळेस अद्याप जिवंत होते. ओल्डहॅम येथे एक प्रचंड सभा झाली व उदारमतवादी लोकांनी मॅक्लिनचा धिक्कार केला. ग्लॅडस्टनसाहेबांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या एका सभेत चित्तरंजनांचे उत्कृष्ट भाषण झाले. ते म्हणाले, 'इंग्रजांनी आम्हाला पाशवी बळाने जिंकलेले नाही. तुम्ही तलवारीने नाही जिंकलेत. आम्ही आपापसात भांडत होतो. आमच्यात ऐक्य नव्हते. शिस्त व संघटना नव्हती. तुमच्यामध्ये हे गुण होते. एकप्रकारे तो तुमचा नैतिक विजय होता. राष्ट्रीय सद्गुण तुमच्यात अधिक होते. आमच्यात त्यांची उणीव होती. परंतु या पार्लमेंटच्या सद्गृहस्थांना पाशवी बळाचा मोठेपणा वाटत आहे. हिंदी लोकांना आम्ही तलवारीने जिंकले, तलवारीने त्यांच्यावर राज्य करू असे ते म्हणत आहेत. हिंदी लोक आमचे गुलाम, असे म्हणत आहेत. असे शब्द ऐकून कोणता हिंदी मनुष्य संतापणार नाही? राष्ट्रे कायमची कोणाची गुलाम राहत नसतात. इंग्लंड व हिंदुस्थान सहकार्याने नाही का नांदणार?'

अशा अर्थाचे चित्तरंजन बोलले. हे त्या काळातील शब्द आहेत ज्या काळात काँग्रेसचा आवाज सामर्थ्यवान नव्हता, काँग्रेस जन्मून सातच वर्षे झाली होती. ती बाल्यावस्थेत होती. अशा काळात इंग्लंडमध्ये हिंदी राष्ट्राची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी चित्तरंजन उभे राहिले. त्यांनी केलेल्या भाषणांना तिकडील वर्तमानपत्रांतून प्रमुख स्थान देण्यात आले. काहींनी अग्रलेख लिहिले आणि या चळवळीमुळे शेवटी त्या मॅक्लिन साहेबास माफी मागावी लागली. पार्लमेंटमधूनही त्यांची हकालपट्टी झाली.

देशभक्तीत पास; आय. सी. एस.मध्ये नापास

चित्तरंजनांनी देशाची प्रतिष्ठा सांभाळली. साहेबाला हिंदी राष्ट्राची क्षमा मागायला लाविले. परंतु आय. सी. एस. च्या परीक्षेचे काय? ब्रिटिश सरकारला चित्तरंजनांची ही तेजस्विता सहन झाली नाही. त्यांना नापास करण्यात आले. जे उमेदवार हवे असतात त्यांना पास करण्यात येते. नापास जे झाले, त्यांच्यात चित्तरंजन पहिले होते. घरी गरिबी वाढत होती. आई-बाप आशेने पाहत होते. चित्तरंजनांस काय वाटले असेल? परंतु ते डगमगणारे नव्हते. ते हसून म्हणत, 'नापास झालेल्यांच्या यादीत तर मी पहिला आहे ना?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel