तुझ्या दारात येऊ दे!
देशबंधू आता मराणाच्याच गोष्टी बोलत. त्यांना का मरण दिसत होते? त्यांचा सर्वांत धाकटा भाऊ वसंतरंजन येथेच मरण पावला होता. त्या भावाची ते सारखी आठवण काढीत होते. तो मला दिसतो असे म्हणत. तो हाका मारीत आहे असे म्हणत. जसजसे मरण जवळ येत होते, तसतसा नामसंकीर्तनाचा नाद वाढला. चंडीदासांची गाणी ते गात. समोर हिमालयाकडे बघत. त्यांची दृष्टी अनंतात बघत आहे असे वाटे.
आणि एके दिवशी त्यांनी भक्तिप्रेममय गाणे केले. त्या गाण्यात कोणता भाव होता, कोणते विचार होते?
'पुस्तकांचे ओझे डोक्यावरून उतरा आता. ज्ञान व अभिमान यांचे गाठोडे. माझ्या डोक्यावरून उतरा आता. हा बोजा डोक्यावर घेऊन घेऊन माझे डोके दुखू लागले आहे. सारे शरीर जीर्णशीर्ण झाले आहे. धापा टाकून हृदय थकून गेले आहे. डोळयांसमोर अंधार आहे. मला आता एकच इच्छा आहे. डोक्यावर मोरमुकुट घातलेला, हातात बासरी असलेला असा तो राधेचा आत्माराम, तो गोपाळकृष्ण, त्याला पाहण्यासाठी माझे प्राण अधीर झाले आहेत, तहानले आहेत, वेद व वेदांत आता विसरून जाऊ दे. प्रभो, तुझे राज्य समोर दिसत आहे. तुझ्या त्या आवडत्या कुंजद्वारात मी येत आहे. माझा विझणारा दिवा पुन्हा पेटवण्यासाठी तुझ्या मंगलधामी मी येत आहे.'
असे हे अंतिम गान देशबंधूंनी आळवले. ही त्यांची शेवटची कविता. जीवनाच्या महांकाव्यातील हे शेवटचे प्रभुसमर्पणाचे गीत. देवाचे राज्य त्यांना दीसू लागले.
परंतु जवळच्या मंडळींस वाटत होते, की देशबंधूंची प्रकृती सुधारत आहे. दोन महिने बहिणी जवळ होत्या. परंतु प्रकृती बरी आहे असे पाहून त्या कलकत्त्यास गेल्या. देशबंधू थोडेथोडे चालत, एका रिक्षाला वर काढण्यासाठी त्यांनी मदतही केली. तोंडावर तजेला दिसू लागला. परंतु हे सारे फसवणारे होते. आणि एके दिवशी तो ताप पुन्हा आला. प्राण घेणारा ताप! २० वर्षांपूर्वी मेलेल्या बंधूंचे त्या दिवशी ते स्मरण करत होते. स्वतःच्या अध्यात्मिक गुरूंचे स्मरण करीत होते. दिलेल्या मंत्रांचे स्मरण करीत होते. मध्येच चंडीदासाची गीते म्हणत. चंडीदास व विद्यापती या दोन कवींची त्यांनी तुलना केली. चंडीदासाच्या गीतांतील प्रेम अतिमानुष आहे, अपार्थिव आहे असे ते म्हणाले.