हत्याकांड

कलकत्त्यातील सभा शांतपणे पार पडली. परंतु दिल्ली, पंजाबकडे कोणते प्रकार होत होते? १९१९ मार्चच्या ३० तारखेस दिल्लीत विराट सभा झाली. तेथे गोळीबार झाले. स्वामी श्रध्दनंद गुरख्यासमोर छाती उघडी करून 'चलाव तेरी गोली' असे म्हणाले. हिंदू-मुसलमानांचे रक्त सांडले. हिंदूंच्या प्रेतास मुसलमानांनी खांदे दिले. मुसलमानांना हिंदूंनी मशिदीतून स्वामी श्रध्दानंदांनी प्रवचने दिली.
पंजाबात ओड्वायर गव्हर्नर होता. त्याने धरपकड सुरू केली. पंजाबला राष्ट्रीय विचारांचा वारा लागू नये अशी त्यांची इच्छा होती. महायुध्दच्या वेळेस रिक्रूटभरतीसाठी पंजाबभर जुलूम झाले होते. लोकांत असंतोष होता. या असंतोषात सत्याग्रहाची ठिणगी पडू नये म्हणून पंजाब सरकार जपत होते. डॉ. किच्लू, डॉ. सत्यपाल वगैरेस अटक झाली. महात्माजी मुंबईहून पंजाबकडे जायला निघाले. परंतु त्यांना वाटेतच अटक करून पुन्हा मुंबईस आणून सोडण्यात आले. देशभर वादळ झाले. अहमदाबादला होळया पेटल्या. कलकत्ता संतापले. पंजाबात तेच प्रकार. अमृतसर येथे जालियनवाला बागेत प्रचंड सभा भरली होती. सरकारचा निषेध करण्यासाठी ही सभा होती. परंतु जनरल डायरने सभेवर गोळीबार केला. गोळया संपेपर्यंत मारा केला. विमानेही आली. काही ठिकाणी बाँबफेकही झाली. आणि लष्करी कायदा सुरू केला. जालियनवाला बागेत शेकडो निरपराध जीव मेले. स्त्रिया, पुरुष, मुले यांची ती क्रूर कत्तल होती आणि लोकांना रस्त्यांवरून फटके मारले. पोटावर सरपटत जायला लावले. विद्यार्थ्यांना उन्हातून अनेक मैल चालविले. हिंदी राष्ट्राच्या विटंबनेस सीमा   नव्हती. आणि या डायरची इंग्लंडमधील लॉर्डांच्या सभेत पाठ थोपटण्यात आली. त्याची नोकरी गेली म्हणून त्याच्यासाठी फंड उभारण्यात आले. याहून अपमान तो कोणता?

हंटर कमिटी व काँग्रेस चौकशी कमिटी

सरकारने या हत्याकांडाची व एकंदर लष्करी कायद्याखाली झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमली. हंटरसाहेब तिचे प्रमुख असल्यामुळे तिला हंटर कमिटी म्हणतात. काँग्रेसनेही चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमली. त्या कमिटीत महात्मा गांधी होते. चित्तरंजनांचीही तिच्यावर नेमणूक करण्यात आली. त्यांची प्रकृती त्यावेळेस बरी नव्हती. तरीही चार महिने या कमिटीचे काम त्यांनी केले. काँग्रेसने भला मोठा अहवाल प्रसिध्द केला. हा अहवाल पुढे सरकारजमा करण्यात आला. हंटर कमिटीने सारी सारवासारवच केली.

अमृतसरची काँग्रेस

१९१९ सालची काँग्रेस अमृतसर येथेच भरली. जेथे शेकडोंचे बलिदान झाले, जे शहर अग्निदिव्यांतून गेले, तेथेच सारे राष्ट्रसेवक जमा झाले. लष्करी कोर्टाने ज्यांना वाटेल तशा शिक्षा फर्मावल्या होत्या, त्यांतील पुष्कळांची मुक्तता झाली. दुःखात थोडे सुख आले; आणि हिंदुस्थानला कोणत्या सुधारणा द्यायच्या त्याही याचवेळेस जाहीर करण्यात आल्या. अमृतसरला महात्मा गांधी, लोकमान्य, चित्तरंजन, डॉ. ऍनी बेझंट, पंडित मोतीलाल नेहरू अशी थोर थोर मंडळी होती. चर्चा चालल्या. सुधारणांसंबंधीचा मुख्य ठराव या काँग्रेसमध्ये चित्तरंजनांनीच मांडला. लोकमान्यांनी चित्तरंजनांकडे नेतृत्व दिले. चित्तरंजन देशाच्या राजकारणात पुढे येऊ लागले. ते हळूहळू अखिल हिंदुस्थानचे पुढारी होऊ लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel