बंगालभर प्रचार
पन्नास हजारांची महिन्याची मिळकत! परंतु एका क्षणात चित्तरंजनांनी त्याचा त्याग केला, त्याग करणे त्यांना जड नसे जात. त्याग हा त्यांचा स्वभाव होता. त्या त्यागाने सारे दिपले. त्या त्यागाने राष्ट्राला स्फूर्ती दिली. भावनामय नवे तरुण चित्तरंजनांचा शब्द झेलण्यासाठी उभे राहिले. महात्माजींनी याच्या आधी कलकत्त्याच्या एका विद्यार्थ्यांच्या सभेत म्हटले होते. 'तुम्ही चित्तरंजनांच्या नेतृत्वाची वाट पाहत आहात. त्यांचे नेतृत्व लवकरच तुम्हाला मिळेल. तो काळ दूर नाही. देशाची हाक येताच सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी ते धावून येतील, अशी मला आशी आहे.' आणि ती आशा पुरी झाली.
'पाडा हे विद्यापीठ!'
चित्तरंजन नागपुराहून आले आणि कलकत्त्यास विद्यार्थ्यांच्या प्रचंड सभा होऊ लागल्या. तेथील विद्यापीठासमोर चित्तरंजनांचे भाषण झाले.
'हे विद्यापीठ का तुम्हाला मोह पाडते? मोह झुगारा. हे विद्यापीठ देशासाठी जाऊ नका असे म्हणत असेल तर या विद्यापीठाच्या इमारतीची एकेक वीट उखडून ती इमारत जमीनदोस्त करा. देशाचे स्वातंत्र्य हाक मारीत आहे. कधी असे क्षण येतात, की ज्या वेळेस सर्वांनी त्याग करावयाचा असतो. सरकारी नोकरशाहीचे आसुरीतंत्र बंद पाडायचे आहे. या सरकारला कोणीही सहकार देता कामा नये. असहराचा मार्ग त्यागाचा आहे, क्लेशांचा आहे. तुम्ही तुमच्या भविष्याकाळावर पाणी सोडा. या नोकरशाहीला नष्ट करण्यासाठी, स्वराज्य स्थापण्यासाठी हा त्याग करा. स्वतःचे कर्तव्य स्वतःलाच न कळले तर दुसर्या ला आपण कशी जागृती देणार? म्हणून उठा. जागे व्हा, कर्तव्याचे स्मरण करा आणि स्वातंत्र्याच्या मार्गावर हिंमतीने, दृढ निश्चयाने व निर्भयतेने उभे राहा.'
असा सर्वत्र संदेश देत चित्तरंजन निघाले. परंतु मैमनसिंगच्या मॅजिस्ट्रेटने तेथे येण्यास बंदी केली. तेथील विद्यार्थ्यांची, जनतेची निराशा झाली. चित्तरंजनांनी पुढील तेजस्वी संदेश पाठविला.
'आपल्याच देशात आपणास पशूप्रमाणे समजण्यात येते. स्वराज्याशिवाय जीवन असह्य आहे.'
आणि दुसर्या एका गावी गेले. तेथे प्रचंड सभा. तेथे वजीदअली म्हणून मोठे जमीनदार होते. ते उदार होते. एक राष्ट्रीय शाळा त्यांनी सुरू केली होती. त्यांच्याच खटपटीने ती प्रचंड सभा भरली होती. चित्तरंजन गावे व शहरे घेत पुढे सिल्हटला गेले. तेथे खिलाफत परिषदेचे ते अध्यक्ष होते. ते म्हणाले,
'नव्या युगाचा हा आरंभ आहे. सर्वांचे ऐक्य होत आहे. सर्व जातीजमातीच्या ऐक्याचा उषःकाल आहे. हे ऐक्य कायमचे राहिले पाहिजे. स्वराज्याच्या सिध्दीसाठी सारे एक व्हा. स्वराज्याशिवाय तरणोपाय नाही. आपल्या स्वतःच्या घरात आपणास कोल्ह्याकुत्र्यांप्रमाणे वागवण्यात येत आहे. न्यायाचा पत्ता नाही. खायला अन्न नाही. अंगभर कपडा नाही. मुलाबाळांची आबाळ होत आहे. स्त्रियांचा अपमान होत आहे. कीडामुंगीप्रमाणे खुशाल आपले प्राण घेण्यात येत आहेत. जालियनवाला बागा होत आहेत. ही सारी स्थिती बदलावयाची असेल तर स्वराज्य मिळविले पाहिजे. केवळ हिंदूंनाच नाही, केवळ मुसलमानांनाच नाही; तर सर्वांना या स्वराज्याची जरूर आहे. ज्याला ज्याला म्हणून प्रामाणिकपणे जगायचे आहे, माणसाप्रमाणे जगायचे आहे त्या सर्वांना जरूर आहे.'