विधीमंडळातील तेजस्वी कार्य
मोतीलाल नेहरू, लालाजी, विट्ठलभाई पटेल इत्यादी थोर मंडळी दि्ल्लीच्या वरिष्ठ विधीमंडळात गेली. चित्तरंजन बंगाल प्रांतिक विधीमंडळात गेले. सरकारचा हमखास पराजय करण्याइतकी त्यांची शक्ति नव्हती. परंतु त्यांनी मुसलमानांचा पाठिंबा मिळविला. हिंदू-मुस्लीम करार त्यांनी केला. बंगालने हिंदुस्थानला शिकविले. की परकी सत्ता दूर करायची असेल तर मुसलमानांस जवळ करा. त्यांच्या ज्या मागण्या रास्त असतील, देशहितास व देशैक्यास विघातक नसतील त्या द्या. मागतील त्याहून थोडे अधिक द्या. केवळ तराजू घेऊन नका बसू. आज बॅ. जिना हिंदुस्थानचे तुकडे करू पाहतात. असल्या मागण्या चित्तरंजन पुरे करेनात. परंतु देशाचे अखंडत्व राखून जितके करता येईल तितके करायला हरकत नाही. चित्तरंजनांनी ही गोष्ट केली. देशाचे खरे हित करू पाहणारा कोणीही थोर दृष्टीचा देशभक्त हेच करील. म्हणून लोकमान्यही कधी म्हणत, 'आधी इंग्रज जाऊ दे. मुसलमानांच्या हाती सत्ता आली तरी चालेल' स्वातंत्र्य आले, की भांडणे बंद होतील. सर्वांना सहकार्याने नांदता येईल. म्हणून स्वातंत्र्यावर आधी लक्ष हवे. काँग्रेस अशा थोर मार्गाने जात आहे. मुसलमानबंधूंजवळ करार करून चित्तरंजनांनी सरकारचे पुनःपुन्हा पराजय केले. अंदाजपत्रके नामंजूर केली. दिवाणांचा पगार तीन रुपये असे ठराव बहुमताने पास केले. परंतु गव्हर्नर जनतेचे मत धुडकावून आपल्या लेखणीने सारे मंजूर करून घेई. या सुधारणा म्हणजे सारा फार्स आहे, जनतेच्या प्रतिनिधींना खरी सत्ता कशी नाही, ते जगाला दिसून आले.
एकच प्रतिभावान पुरुष
देशबंधूंचा हा स्वराज्य पक्ष पाहून श्री अरविंद घोष म्हणाले, 'काळ-वेळ पाहून कसे वागावे, परिस्थित्यनुरूप कसे धोरण आखावे, हे ओळखण्याची व तद्नुरूप वागण्याची प्रतिभा व धीरता एका देशबंधूंतच आहे. बंगालमध्ये असा दुसरा कोण आहे?'
त्यांना कसेही करून पाठवा
आणि एकदा चित्तरंजन आजारी होते. विधीमंडळात हजर होणे फार आवश्यक होते. वासंतीदेवींना पतीचा स्वभाव माहीत होता. हे गेल्याशिवाय राहणार नाहीत अशी त्यांची खात्री होती. वासंतीदेवी डॉक्टरांस म्हणाल्या, ''गाडी करा, डोली करा; काही करा. परंतु यांना विधीमंडळात पाठवण्याची लवकर व्यवस्था करा. पृथ्वीवरची कोणतीही शक्ति यांनी एकदा निश्चय केला म्हणजे त्याला फिरवू शकणार नाही. तुम्ही दुसरी काही व्यवस्था न कराल तर हे पायी चालत जातील. आणि त्याचा परिणाम तुमच्या माथी बसेल.'' आणि आजारी देशबंधू विधीमंडळात गेले. सरकारची फजिती करते झाले. मुसलमान बंधूंस फोडण्यासाठी सरकार कशी कारवाई करीत होते, त्याचे काही कागदपत्र चित्तरंजनांस मिळाले होते. त्यामुळे चित्तरंजन यांनी सरकारला खाली पाहायला लावले. 'जरूर तर तो पत्रव्यवहार मी येथे हजर करीन,' असे म्हणताच सरकारी दिवाणांचे चेहरे खर्रकन उतरले.