बॅरिस्टर झाले
देशाचे भाग्य की चित्तरंजन आय. सी. एस. झाले नाहीत. त्यांची सेवा भारतमातेस मिळावयाची होती. परकी सरकारला मिळावयाची नव्हती. ते आता बॅरिस्टरीकडे वळले. पैशाची फार टंचाई असे. घरून वेळेवर पैसे येत नसत. चित्तरंजन कसे तरी राहत होते. दोन-दोन, तीन-तीन दिवस ते केवळ पाव व गरम पाणी यावर राहत. कोठला चहा, कोठली कॉफी? शेवटी ते बॅरिस्टर झाले व मातृभूमीस यायला निघाले.
गंमतीचा गंभीर परिणाम
चित्तरंजन आईला प्रत्येक आठवडयास पत्र पाठवीत असत. इंग्लंडहून निघताना त्यांनी आईला घरी तार केली नाही. परंतु निघत आहे अशा अर्थाचे पत्र लिहून पोस्टात टाकण्यासाठी आपल्या मित्राजवळ त्यांनी देऊन ठेवले. परंतु मित्र ते टाकायला विसरला. घरी पत्र गेले असेल, अशी देशबंधूंची कल्पना होती. ते मुंबईस उतरले. परंतु आईला चकित करू, गंमत होईल असे त्यांना वाटत होते. ते मुंबईहून पाटण्यास आले. तेथे मित्राकडे राहिले. तेथे मित्राजवळ बोलताना म्हणाले, ''घरी जाऊन एकदम चकित करीन.'' शेवटी त्या मित्राने चित्तरंजनांच्या घरी तार केली की चित्तरंजन आला आहे. परंतू घरी आई ध्यास घेऊन बसली होती. दर आठवडयास चित्तरंजनचे पत्र यावयाचे. परंतु ना पत्र, ना तार. त्या प्रेमळ मातेने अन्नपाणी वर्ज्य केले. ती अंथरूणास खिळली. जेव्हा त्या मित्राची तार आली, तेव्हा आईला धीर आला. आणि चित्तरंजन घरी आले. एकदम आईजवळ हृदये उचंबळली. आपण गंमत करणार होतो, आईला चकित करणार होतो, तो सारा आनंद पार कोठल्याकोठे गेला. आईची कृश मूर्ती पाहून चित्तरंजन फार दुःखी झाले. त्यांनी आईची क्षमा मागितली.
वकिलीस सुरुवात
चित्तरंजन १८९३ मध्ये विलायतेतून कलकत्त्यास आले आणि त्यांनी वकिली सुरू केली. घरी सारी ददात होती. वडील, लोकांचे कर्ज फेडून स्वतः कर्जबाजारी झाले होते. पुढे ही जामिनकी त्यांना भरावी लागली. कोठून आणायचे पैसे? ते स्वतः कर्जाच्या समुद्रात बुडाले. कोण तारणार, कोण वर काढणार? चित्तरंजनांच्या मनात आले की वकिली करून एके दिवशी हे सर्व कर्ज फेडू.
नांदारीत नाव
भुवनमोहनबाबूंनी एके दिवशी स्वतःचे नाव दिवाळखोरीत नोंदविले. अतःपर कर्ज फेडता येत नाही असे पित्याने खाली मान घालून जाहीर केले. परंतु पित्याच्या अपमानात पुत्रही भागीदार झाला. स्वतःचेही नाव दिवाळखोरांच्या यादीत सामील करण्याची चित्तरंजनांस जरूर नव्हती. परंतु पित्याची अप्रतिष्ठा होत असता त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेची पर्वा वाटत नव्हती. तेही दुनियेसमोर एक दिवाळखोर म्हणून उभे राहिले.