मायबापांचे निधन

आणि वडील भुवनमोहन आजारी पडले. आईही आजारी पडली. आई अत्यवस्थ आहे असे कळताच ते लगेच परतले. परंतु वाटेतच त्यांना स्वप्न पडलं. आईचा आत्मा उडून जात आहे. असे त्यांनी पाहिले. ते घरी आले तो आई निघून गेली होती. आई गेली आणि पुढे सहा महिन्यांनी वडीलही मरण पावले. त्यांनी दानधर्म केला. गरिबांना अन्नदान दिले. भरपूर मेवामिठाई वाटली. ते स्वतः हजर राहून सर्वांना पोटभर मिळते का नाही ते पाहत होते. ते स्वतः वाढीतही होते.

स्फूर्तिदात्री माता

आईवर त्यांचे अपार प्रेम होते. माता त्यांची स्फूर्तिदेवता होती. रोज कोर्टात जाण्याच्या आधी ते आईच्या पाया पडून जात. आईच्या आशीर्वादावर त्यांची श्रध्दा होती. आईचे स्मरण येताच त्यांचे डोळे भरून येत. मरताना त्यांची आई म्हणाली, 'जन्मोजन्मी हाच पती मिळो; चित्तरंजनासारखा मुलगा मिळो.' या उद्गारावरून आईचे चित्तरंजनांवर किती प्रेम होते त्याची कल्पना येईल.

समाजसुधारक

चित्तरंजनांचे वडील ब्राह्मो समाजाचे सभासद होते. परंतु चित्तरंजन वैष्णवधर्मीच होते. वैष्णवधर्मी असूनही ते समाजसुधारक होते. चित्तरंजनांवर ब्राह्मपंथीयांचाही राग व सनातनी वैष्णवधर्मीयांचाही राग. रूढी वगैरे ते मानीत नसत. त्यांनी आपल्या मुलींचे मिश्र विवाह केले होते. मोठी मुलगी अपर्णादेवी. सुधीरचंद्र रॉय नावाच्या एका तरुणावर तिचे प्रेम होते. परंतु सुधीरचंद्राचे वडील परवानगी देत नव्हते. तीन वर्षे चित्तरंजनांनी वाट पाहिली. शेवटी सुधीरचे वडील विरघळले. एका मुलीच्या लग्नात भटजीसही बोलवायचे नाही असे त्यांचे म्हणणे होते. परंतु वासंतीदेवी सांगत होत्या, 'भटजी वगैरे बोलवा. सुधारणा हळूहळू करा. एकदम सर्वांची मने दुखवू नका.' चित्तरंजन गच्चीत फेर्‍या  घालीत होते. शेवटी पत्नीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी केले. हुंडा वगैरे घेण्याच्या ते विरुध्द होते. बंगाली कन्या स्नेहलता हिने हुंडयापायी स्वतःला जाळून घेतले होते. वरविक्रयाची ही रूढी पाहून चित्तरंजन संतापत, दुःखी होत. ते एकदा म्हणाले, 'आपली अनंद निद्रा अद्याप जात नाही ही दुःखाची गोष्ट आहे. अनेक स्नेहलता भस्म होत आहेत, तरी आई-बाप जागे होत नाहीत. मुलींची हुंडयांमुळे लग्ने होत नसतील तर त्यांना शिकवा. स्वतःची जीवनयात्रा चालविण्यास त्यांना समर्थ करा. त्या समाजोपयोगी कामे करतील. जीवन कृतार्थ करतील.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel