वैराग्य
देशबंधू वैभवाच्या शिखरावर होते. परंतु एकदम त्यांनी दारिद्रयाला मिठी मारली. ते पूर्वी मद्य घेत. परंतु त्याचा त्यांनी त्याग केला. ते मांसाहार करीत. त्याचाही त्यांनी त्याग केला. फक्त धूम्रपान त्यांना सोडवेना. ते आपल्या एका मित्राला म्हणाले, ''तू वकिली सोडीत असशील तर मला न सोडवणारी ही सिगारेटही मी सोडीन.''
देशसेवकाला गादी शोभत नाही
सत्याग्रही झाल्यावर देशबंधू घोंगडीवर निजू लागले. एकदा एका मित्राकडे उतरले होते. ते आपली पाठ चेपीत होते. मित्राने विचारले, ''पाठ का दुखते?''
''हो'' ते म्हणाले.
''कशाने दुखते? तेल चोळू? आयोडाईन लावू? डॉक्टर बोलावू? नेहमी का दुखते? सांगा ना?''
''काय सांगू? या पाठीला गादीवर निजण्याची सवय आहे. हलज्ी घोंगडीच असते. म्हणून ती दुखत आहे.''
''मग गादी घालू का?''
''देशसेवकाला गादी शोभत नाही'' ते रागाने म्हणाले.
आणखी दोन घास खा
त्यांचे जेवण्यातही लक्ष नसे. परंतु वासंतीदेवी नेहमी जवळ असत. देशबंधूंनी कमी खाल्ले तर त्या म्हणायच्या, ''आणखी दोन घास खा.'' अधिक खाऊ लागले तर वासंतीदेवी म्हणायच्या ''पुरे हो आता.''
औदार्य
देशबंधूंच्या औदार्याच्या किती गोष्टी सांगाव्या. किती गुप्त दाने, मूकदाने. बहिणीचा आश्रम नीट चालावा म्हणून दोन लाख रुपये त्यांनी दिले. परंतु ते दान कोणासही माहीत नव्हते. कधी कोणी त्यांच्याकडे उसनवार रक्कम मागायला येई. ते लगेच देत. एकदा वसुमती पत्राचे चालक एकदम ४० हजार रुपये मागायला आले. देशबंधूंनी व्यवस्था केली. एका अक्षरानेही काही विचारले नाही. कोणी आप्त म्हणाले, ''चित्तरंजन, उद्या पैसे न मिळाले तर?''
''परत मिळण्याच्या विचाराने मी कधी देत नसतो.'' ते म्हणाले, एकदा एक गरीब विद्यार्थी अडचणीत होता. ''देशबंधूंकडे जा'' त्याला कोणी म्हणाले. तो देशबंधूंकडे आला. त्याची कायमची व्यवस्था झाली. शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली होती.
मतभेद तरीही मदत
बिपिनचंद्र पाल हे जुने देशभक्त. मोठे विद्वान, परंतु असहकार त्यांना मान्य नव्हता. महात्माजींना ते मिस्टर गांधी म्हणूनच संबोधावयाचे, तरीही देशबंधू पूर्वीप्रमाणेच त्यांचा सारा खर्च चालवीत.