कलकत्त्याची खास काँग्रेस

देशात अशांतता होती. पंजाबमधील अन्याय सरकारने दूर केला नव्हता. रौलेट कायदा रद्द करण्यात आला नव्हता. आणि महायुध्दत तुर्कस्थानसाठी म्हणून हिंदी-मुसलमानांना दिलेली अभिवचने तहाच्या वेळेस खुशाल मोडण्यात आली होती. यामुळे सारे हिंदु-मुसलमान एक झाले. महात्माजींनी या सरकारवर संपूर्णपणे बहिष्कार घालावा असे राष्ट्राला सुचविले. त्याचा विचार करण्यासाठी म्हणून कलकत्त्यास काँग्रेसचे खास अधिवेशन करण्याचे ठरले. याच वेळेस लोकमान्य देवाघरी गेले. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्यांनी देह ठेवला. जणू महात्माजींच्या हाती राष्ट्र देऊन ते गेले आणि पुढे ४ सप्टेंबरला लालाजींच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्यास जादा अधिवेशन झाले. महात्माजींचा संपूर्ण बहिष्काराचा ठराव मंजूर झाला. कोर्टावरील बहिष्कार व शाळा-कॉलेजांवरील बहिष्कार याला चित्तरंजनांचा विरोध होता. सरकार धरपकडी करते. खटले भरते. कोर्टे मोकळी असावीत. तसेच हजारो लहानमोठया विद्यार्थ्यांचे काय करावयाचे? परंतु सर्व राष्ट्राचा जेव्हा संप असतो तेव्हा  या गोष्टीचा विचार करायचा नसतो. एक प्रचंड सामुदायिक प्रयोग होता. तो महान राष्ट्रीय प्रयत्न होता. त्यात सर्वांनी सामील होणे जरूर होते. आणि अशा वेळेस तरुणांना नाही हाक मारायची तर कोणाला?

नागपूरची काँग्रेस


कलकत्त्याच्या जादा अधिवेशनानंतर महात्माजी देशभर विजेसारखे हिंडू फिरू लागले. त्यांचे लेख रामबाणाप्रमाणे हृदयात घुसत होते. नव हिंदुस्थान निर्माण केला जात होता. निःशस्त्र जनतेला महात्माजी असहकाराचे अहिंसक शस्त्र देऊ पाहत होते. राष्ट्राची मान उंच होणार होती. चित्तरंजन नागपूर येथे १९२० च्या डिसेंबरमध्ये भरणार्‍या  काँग्रेसला निघाले. महात्माजींच्या ठरावाला विरोध करण्यासाठी म्हणून ते आले. बरोबर शेकडो प्रतिनिधी ते घेऊन आले होते. परंतु काय चमत्कार! महात्माजींनी चित्तरंजनांना जिंकून घेतले. पंडित मोतीलाल नेहरू आधीच मिळाले होते आणि आता हा बंगालचा महान नेताही मिळाला. विरोध करायला आलेल्या चित्तरंजनांनीच काँग्रेसच्या खुल्ला अधिवेशनात महात्माजींचा तो असहकाराचा ठराव मांडला. जीवनात क्रांतीची वेळ आली.

चित्तरंजन बोलतो तसा वागतो


आणि ठराव मांडून त्यावर चित्तरंजन बोलत होते. ती मेघगंभीर भावनोत्कट वाणी सुरू होती. परंतु सभेतील कोणी एकाने विचारले, 'कोर्टावर बहिष्कार, वकिलांनी वकिल्या सोडाव्या, परंतु तुमचे काय? विजेप्रमाणे एकदम चित्तरंजन भविष्यवाणी बोलले,' 'चित्तरंजन बोलतो तसा वागतो.' त्या उदात्त व निश्चित शब्दांचा जादूसारखा परिणाम झाला आणि दुसर्‍या  दिवशीच चित्तरंजनांनी वकिली सोडल्याचे वर्तमानपत्रांनी सर्व जगाला कळविले. सारे जग चकित झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel