सतीचा संदेश
वीरपत्नी वासंतीदेवीने पुढील संदेश झेंडा निघताना दिला होता. 'आम्हाला पकडण्यात येईल या तयारीनेच आम्ही निघत आहोत. आपली मुले स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जात असता आपण का घरी राहायचे? मुलांच्या पाठोपाठ माता. घरी राहणे सहन होत नाही. तरुण तुरुंगांत गेल्यावर त्यांचे अपुरे राहिलेले काम पुरे करण्यासाठी मातांनी बाहेर पडले पाहिजे. हे बाहेरचे जीवन म्हणजे एक मोठा तुरुंगच आहे. गुलामीची घाणेरडी हवा खात बाहेर राहण्यापेक्षा तुरुंगात राहणे अधिक मानाचे आहे. सरकारी संस्थांतील विद्यार्थ्यांनी बाहेर पडावे. मरण येवो वा विजय मिळो. दोन्ही कीर्तीकरच आहेत? परंतु मरण किंवा स्वतंत्र होऊन जगणे याहून तिसरा मार्ग कोणता? ही गुलामी तर नाहीच राहता कामा.'
आपल्या आयाबहिणी झेंडा हाती घेऊन बाहेर पडतात आणि आपण का घरी बसयाचे? शाळा-कॉलेजात जावयाचे? विद्यार्थी खडबडून जागे झाले. स्वयंसेवक होऊ लागले. तुरुंगात जाऊ लागले. चित्तरंजनांचे हृदय नाचू लागले. त्यांनी पुढील पत्रक प्रसिध्द केले.
'स्वराज्य मिळवू पाहणार्या प्रत्येक कार्यकर्त्याने तीन प्रकारचे भय सोडले पाहिजे. जेलचे भय, लाठीमाराचे भय आणि छातीवर गोळया झेलण्याचे भय. जेलची भीती तर गेली. लाठीमाराचेही भय जात चालले आहे. आता गोळीबाराचे भय कधी जाईल ते सरकारवर अवलंबून आहे. परंतु आमच्या लोकांना मी आठवण देऊन ठेवतो, की आपला मार्ग अहिंसेचा आहे. आपण अहिंसा इतकी पाळू या की प्रत्येक पापभीरू व परमेश्वर मानणारी व्यक्ति आपल्याच बाजूला येईल.'
बंगालच्या गव्हर्नरांनी चित्तरंजनांस भेटीसाठी बोलविले. राजपुत्राचे स्वागत नीट व्हावे, त्यावेळेस गडबड नको अशी सरकारची इच्छा होती. चित्तरंजन भेटीसाठी गेले. परंतु वाटाघाटीत काहीही निष्पन्न झाले नाही. सरकारही दडपशाहीसाठी दुप्पट जोराने तयार झाले. देशभर पुढारी स्वयंसेवक यांची धरपकड सुरू झाली. लाला लजपतराय, मोतीलाल नेहरू वगैरेंना अटक झाली. हिंदुस्थानभर जवळ जवळ वीस हजार लोक तुरुंगात गेले आणि चित्तरंजन?