आपल्या वासनांची भूक शमवण्याची त्यांनाही इच्छा असते. परंतु तसा वाव न मिळाल्यामुळे काही स्त्रिया वेड्या होतात. कारण अतृप्त भावना म्हणजे परम कठीण वेदना होत. त्यामुळे जीवाची तगमग होते. माणसाला काही सुचेनासे होते. ज्यांना लग्न करणे अशक्य असते, त्या दुस-या साधनांचा अवलंब करतात व आपली भूक शांतवू बघतात; आणि त्यांच्या या अनिर्बंध वर्तनाकडे आपणास कानाडोळा करणे भाग असते. एका पुरुषाला अनेक बायका असणे हे जरी बेकायदेशीर असले, तरी व्यवहार तर सर्रास तसा चालु आहे आणि अशा ह्या व्यवहारामुळे रोग फैलावत आहेत, वंचना होत आहेत, अश्लीलता वाढत आहे. शिवाय तरुण-तरुणी आमरण एकमेकांस प्रेमाने बिलगून बसतील, असे सांगणेही फोल आहे. असल्या आशा दाखवण्यात काय अर्थ ? कायमचा परस्परांना जखडून टाकण्याचा करार न केला तरच प्रेम सुरक्षित राहण्याचा संभव आहे. आज जी सामाजिक अशांतता आहे, तिच्यावर एकच उपाय आमच्या मते आहे. तो उपाय म्हणजे ‘प्रायोगिक विवाह.’
संशयवादी म्हणतात, ‘भूतकाळाकडे पुन्हा वळणे योग्य नाही.’ परंतु आजची परिस्थिती पाहून त्यांचे मन खचते. घटस्फोट वाढत आहेत. कौटुंबिक घटक न्यायमंदिरातील निकालाने अलग अलग होत आहे. नवीन पती जोडले जातात, नवीन पत्न्या मिळविल्या जातात. मुलांची ओढाताण होते. बाप पहिला तर आई नवीन. आई पहिली तर बाप नवीन, अशी सृष्टी मुलांसमोर असते. त्यांची कोणी काळजी घेत नाही आणि त्यांच्यावर आई-बापांचे नियंत्रणही नीट राहत नाही. कुटुंबातील ते हितकर व कल्याणकर असे वातावरण नष्ट झालेले असते. मुलावर सत्संस्कार होत नाहीत. हे सारे पाहून हे साशंकवादीही निराश होतात व हात चोळीत बसतात. तरणोपाय काय ते त्यांना समजत नाही. जसे व्हायचे असेल तसे होईल, असे म्हणून निश्चित प्रगती नव्हे. काही तरी यातून निष्पन्न होईल अशी वाट ते पाहत असतात.
दुसरे निर्भय विचारकर्ते असे उदघोषितात की, जगणे हेच जीवनाचे ध्येय. ज्यांना मस्तपणे नीट जगावे असे वाटत नाही अशा भितुरड्यांची कीव करावी. जीवनातील आनंद भोगावे, एक प्रकारची गोड प्रक्षुब्धता अनुभवावी. जीवनातून ते डोळे मिटून जातात. जीवनाकडे डोळे उघडे ठेवून ते बघत नाहीत. हे पुरुषार्थी पापे करतात व दुर्मिळ आनंद अनुभवितात. वासना-विकार जीवनात असणारच. कुरकुरण्यात काय अर्थ ? शारीरिक सुखे म्हणजे काही अपराध नव्हे. त्यांनी आत्मा बाटत नाही, विटाळत नाही. ज्यांच्याशी आपली बौद्धिक समधर्मिता आहे, ज्यांच्याकडे आपले मन ओढते, त्यांच्या देहाशीच आपण परिचय करुन घेतला तर त्यात काय बिघडते ? आपण माणसे अमुक चांगले व अमुक वाईट असे म्हणतो. परंतु निसर्गाला सारे सुंदरच वाटते. यांचा नास्तिकवाद निसर्गमूल आहे. सारे सृष्टीच्या नियमानुसार चालले आहे. सृष्टीतील काही शक्ती एकत्र आल्या व हा मानवी आकार जन्माला आला. पुन्हा या शक्ती दूर होतील व हा मानवी आकार जगातून नाहीसाही होईल. म्हणून जोपर्यंत हा मानवी देह आहे, तो पर्यंत सुख भोगावे.