पैसा म्हणजेच सर्व काही नव्हे. उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येत नाहीत. मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व शांती, सदभाव व सदिच्छा या वस्तू बाजारात मिळत नाहीत. धनाच्या राशी ओतल्या तरी त्या लाभत नाहीत. आणि याच वस्तू सर्वांना हव्या असतात. सर्वांना यांची इच्छा असते. जीवनात केवळ उपयुक्ततावाद नसतो. माणसे म्हणजे का संपत्ती निर्मिणारे ? माणसे म्हणजे का केवळ हमाल व मजुर ? आपण आधी मनुष्य आहोत, मानव आहोत. आणि म्हणूनच सौंदर्याचे प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपणास ओढतात. जोपर्यंत मनाचे समाधान नाही, मनाचे स्वातंत्र्य नाही, तोपर्यंत बाह्य सोंगढोंगे काय कामाची ? बाहेरचे रागरंग काय किंमतीचे ? मनुष्याचे भौतिक जीवन सुधारण्यासाठी आपण हपापलो आहोत. आणि म्हणून आज बदलत्या संस्थांवर आपले सारे लक्ष केंद्रित झाले आहे. अर्वाचीन जीवन यंत्रमय व गुंतागुंतीचे झाले आहे आणि त्यातच आपण गुरफुटलो आहोत. त्यात सुधारणा कशी करायची? या बदलत्या काळात सुखसमाधान कसे निर्मावयाचे ? काय फेरफार हवे ? जोपर्यंत मनुष्यांच्या गरजा वाढत नाहीत, त्या गरजांचे स्वरुप बदलत नाही, तोपर्यंत सामाजिक संस्थात व यांत्रिक संघटनांत कितीही सुधारणा केल्या तरी उपयोग नाही. भौतिक व आर्थिक गरजा, सामाजिक व आध्यात्मिक गरजा जोपर्यंत नीट भागविल्या जात नाहीत, तोपर्यंत काय ? जीवनातील रामरगाड्यापासून शास्त्र मुक्त करील; जीवनातील ओसाडपणा, भकासपणा शास्त्रामुले दूर होईल; शास्त्रामुळे रिकामा वेळही मिळेल. परंतु आपल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपण शिकू या. नीट शिक्षण दिले तर हे होईल.
राजकारण
लोकशाहीचा अर्थ काय ? समाजाने आपला कारभार स्वतः हाकणे म्हणजे लोकशाही. समाजाचे स्वराज्य म्हणजे लोकशाही. सर्वात चांगली राज्यपद्धती कोणती? जी कामात कमी राज्य करते ती. मनुष्यस्वभाव मुळचा चांगला आहे अशी ध्येयवादी दृष्टी जे पत्करीत नाहीत, ते शासनपद्धतीची अधिक सत्ता असावी असे प्रतिपादितात. ‘सक्तीने मनुष्यस्वभाव दबला जाईल’ असे मनुष्यस्वाभावाची ज्याला काही प्रतिष्ठा वाटते असा मनुष्य तरी म्हणणार नाही. मनुष्य म्हणजे रानटी पशू असे ज्याला वाटत असेल तो मात्र म्हणेल की, जरब दाखविली की सारे ठीक होईल. कोणत्याही राज्यशासनाचा हेतू असा असावा, की शेवटी मनुष्य एक दिवस स्वयंशासित होईल.
लोकशाही म्हणजे ‘बहुजनसमाजाची इच्छा सार्वभौम’ असे समजायचे. परंतु विशिष्ट तांत्रिक गोष्टी बहुजनसमाजाच्या इच्छेला झेपणार नाहीत. हिंदुस्थानची राज्यघटना कशी असावी, आयात-निर्यात करांतील सुधारणा, अशासारखे प्रश्न तज्ज्ञांसमोरच ठेवावे लागतात. ब-याचशा देशांत लोकशाही यशस्वी झाल्यासारखी दिसते, कारण ती खरी लोकशाही नाही म्हणून! लोकशाही अद्याप कोठेच नाही. ती अद्याप दूर असलेले, अप्राप्त असे ध्येयच आहे. परंतु एक चालचलाऊ तत्त्व म्हणून लोकशाहीचा आपण आधार घतो, ‘लोकशाही’ तत्त्वाचा स्वीकार करतो. याचा अर्थ इतकाच की मनुष्याच्या व्यक्तित्वाचे काही जन्मजात हक्क असतात, या हक्कांचे दुस-यांशी वागताना कधीही अपहरण होता कामा नये, हे हक्क सदैव आदरिले गेले पाहिजेत.