डॉं. राधाकृष्णन् हे आधुनिक भारताचे तत्त्वज्ञ मुनीच आहेत. प्रखर पांडित्य, विशाल बुद्धीमत्ता, सर्व विचार-मतांबद्दल अपार सहिष्णुता आणि वेळोवेळी जगभर फिरुन आपल्या प्रभावी वाणीने त्यांना घडविलेले भारताचे खरेखुरे दर्शन, यायोगे प्राचीन ऋषीमुनींचीच परंपरा त्यांनी आपल्या आचरणातून प्रकट केलेली आहे.
एक आठवण अशी आहेः डॉं. कागावा हे जपानी सदगृहस्थ भारतात आले होते. डॉ. कागावा यांच्यावर महात्मा गांधी आणि गांधीजींची विचारसरणी यांचा फारच प्रभाव पडलेला होता. ते स्वतःला गांधीजीचे अनुयायी म्हणवून घेत असत. त्यांचा गांधीप्रणीत आचार-विचारांमुळे त्यांना ‘जपानचे गांधी’ असेच म्हणण्यात येत असे. ‘गांधी’ हे एका जीवनपद्धतीचेच नाव बनले होते. तर डॉ.कागावा एकदा गांधीजींना भेटण्यासाठी भारतात आले असता त्यांनी भारतदर्शनाची इच्छा प्रकट केली. त्यावर गांधीजी डॉ. कागावा यांना म्हणाले होते, “तुम्हाला जर खराखुरा हिंदुस्थान पाहावयाचा असेल तर आग्रा येथील ताजमहाल, शांतीनिकेतनातील कविवर्य रवींद्रनाथ टागोर आणि पाँडेचरीच्या आश्रमामधील महर्षि अरविंद घोष या तीन गोष्टीबरोबरच सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ डॉ. राधाकृष्णन् यांची अवश्य भेट घ्या !”
गांधीजींच्या या शिफारशीत बरेच काही येऊन जाते.
प्राचीन ऋषीमुनींचीच परंपरा त्यांनी आपल्या आचरणातून प्रकट केलेली आहे.
डॉ.राधाकृष्णन् यांच्या बुद्धिमत्तेने आणि प्रचंड व्यासंगाने जगभरचे भलेभले विद्वान, पंडीत तर चकित झालेच ; पण स्टॅलिनसारखा रशियाचा पोलादी नेताही त्यांच्या बुद्धिप्रभावाने आकृष्ट झाला होता, हे विशेष !
त्यावेळी डॉ. राधाकृष्णन् रशियात भारताचे वकील म्हणून काम पाहात होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ च्या नजीकच्या काळातली ही गोष्ट. स्टॅलिनच्या कर्तृत्वाचा दबदबा त्या वेळी केवळ ऱशियामध्येच नव्हता, तर जगभर पसरलेला होता. एक जबरदस्त एकाधिकारशाहा अशी त्याची प्रतिमा होती. सर्वसाधारणपणे स्टॅलिन हा कोणालाच किंवा कोणत्याच राष्ट्राच्या वकिलाला कधी भेटत नसे पण काय झाले कोणास ठाऊक, डॉ. राधाकृष्णन् यांची कीर्ती ऐकून एकदा स्टॅलिनदेखील म्हणाला की, “चोवीस तास अध्ययन करणा-या त्या भारतीय प्रोफसराला मला भेटायचे आहे.”