दैनिक जीवनाला विशिष्ट अर्थ असतो व त्याला सार्वजनिक, सामाजिक महत्त्व असते. ज्या क्रियेत हेतुपुरस्सरता नाही, जी क्रिया सहजधर्म म्हणून झाली, ती नैतिक म्हणता येणार नाही. स्वाभाविक क्रिया, प्रतिक्रिया यांना नैतिक मूल्य नाही. ज्यांना आपण नैतिक क्रिया म्हणतो, त्यांतून कोणता तरी विचार प्रकट होत असतो. त्या क्रिया कोणत्या तरी उद्देशाला मूर्त करीत असतात. त्या क्रिया विशेष अर्थाने होत असतात, म्हणूनच महत्त्वाच्या असतात. मानवी प्रकृती ओबडधोबड असते. तिला आकार द्यायचा असतो. आपल्या आडमुठ्या स्वभावाला वळण देऊन आध्यात्मिक ध्येये मिळवावयाची असतात. आत्मोन्नतीची, आत्मप्राप्तीची साधने आपापल्या या मातीतून घडवावयाची असतात. आपण वळण कोणते देतो, आकार कसा देतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. मानवी जीवनाचे सारे आविष्कार अर्थपूर्ण आहेत. प्रत्येकाची किंमत त्यातील हेतूवरुन, त्यातील तत्त्वावरुन होत असते. आपणास एकच ठराविक ठसा किंवा साचा मिळणे अशक्य आहे. प्रत्येक व्यक्ती अपूर्व आहे. प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण इतरांपेक्षा निराळा असतो. ध्येय कोणतेही असो; त्या ध्येयाचे स्वरुप काय, ते शक्य आहे की नाही हे आधी नीट लक्षात घेणे जरुर आहे. नंतर त्या ध्येयप्राप्तीचा मार्ग नीट आखून, कष्ट करीत हालअपेष्टा सोशीत, संकटाशी झुंजत त्या ध्येयाला भेटण्यासाठी निघाले पाहिजे. दुसरे असे की, आपली वर्तवणूक नैतिक ठेवण्यासाठी ती सामाजिक हिताची असली पाहिजे. आपल्या वर्तनाने समाजाची सुस्थिती राहीली पाहिजे. समाजाची विघटना नाही होता कामा. समाजाचे रक्षण झाले पाहिजे. आपल्या कर्माने समाजात मेळ राहील, अविरोध राहील असे झाले पाहिजे. समाजात संगीत निर्माण करणे, समाजाचा विध्वंस होऊ न देणे हे उत्क्रातीतत्त्वाचे रहस्य आहे. मानवजातीचे उच्चाटन करील असे कोणतेही कृती नैतिक असू शकणार नाही. समाजात उगीच विरोध वाढवणारी कोणतीही कृती नैतिक नाही. समाजात उगीच आपला आणखी एक तिसरा सूर काढू नये. विघटना नको, संग्राहक संघटना हवी. प्रत्येक व्यक्तीचे विशिष्टत्व आदरिणे म्हणजेच नैतिक जीवन. दुस-यांच्या भावना, वृत्ती या तुच्छ नाही लेखता कामा.
दुस-यांच्या मोठेपणाची जाणीव असणे, तो मोठेपणा कबूल करणे, त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजेच सदाचार. अशानेच खरोखर मानवी जीवन वैभवशाली होते, विविध व श्रीमंत होते. फोनिशियन माता स्वतःचीच मुले खाऊ लागल्या. त्यांना मोलॉकने प्रतिबंध केला. मोलॉकने ती गोष्ट नसती, तर दुस-या कोणत्या तरी देवाने थांबविली असती. सारी माणसे अपूर्व आहेत. एकजण दुस-यासारखा नाही. ही अपूर्वाई, ही नवलाई हा आपला सर्वांचा विशेष धर्म आहे. या जागतिक उत्कांतीचे ध्येय काय? ध्येय हे की, सर्व विविधतेतून एक सुंदर एकता निर्माण व्हावी. लहान-मोठ्या अनेक शिखरांमिळून एक हिमालय शोभावा. प्रत्येकाच्या जीवनाचे विशिष्ट फूल फुलावे व विविध रंगांच्या व गंधांच्या फुलांचा एक भव्य ताटवा जगात फुलावा व खुलावा.
जे आहे त्याचा स्विकार करुन त्यातून सौंदर्य निर्मिण्यासाठी प्रयत्नपूर्वक झटणे म्हणजेच नैतिक प्रगती. एखादी व्यक्ती घ्या. किती भिन्नभिन्न वृत्ती, प्रवृत्ती त्या व्यक्तीच्या ठायी असतात. किती राग-द्वेष, किती वासना – विकार, किती चंचलता, किती लहरीपणा! परंतु अशांतूनच सौंदर्य निर्मावयाचे आहे. या मातीतूनच मांगल्याचा साक्षात्कार करुन घ्यावयाचा आहे. हीच आपली सामुग्री, हेच साहित्य.