आंतरराष्ट्रीय संबंध
सर्व राष्ट्रांचा एक जागतिक संघ व्हावा व् गुण्यागोविंदाने सर्वांनी राहावे, असे तोंडाने  केवळ म्हणून काहीएक निष्पन्न होणार नाही. ओठांवर सुंदर व उदात्त शब्द खेळविल्याने ध्येयाचा साक्षात्कार होत नसतो. अशी मोठमोठी ब्रीदवाक्ये उच्चारणे ही आजकालची पद्धतच झाली आहे. परंतु त्या शब्दांत आत्मा नसतो. सर्व जगाचे एक कुटुंब व्हावे यासाठी जगातील मालमत्ता सर्वांची, असे होण्यासाठी आधी बंधुभाव वाढविला पाहिजे. राष्ट्राराष्ट्रांत सहकार्य वाढले पाहिजे. आज तर सर्वत्र गैरसमज माजले आहेत. देशभक्तीच्या नावाने सर्वत्र विनाश होत आहे. ज्या राष्ट्राचे आपणास ज्ञान नसते त्या राष्ट्राचा आपण द्वेष करतो. एकमेकांस नीट समजून घेऊ या. न्यूमनने एक अनुभव सांगितला आहे; त्यावेळेस इंग्लडचे नेपोलियनशी सारखे युद्ध सुरु होते. लंडन शहरातून एकदा फ्रेंच कैदी जात होते. इंग्रज लोकांची गर्दी झाली होती. ती गर्दी त्या अभागी फ्रेंचांना पाहण्यासाठी झाली होती. फ्रेंच लोक कसे असतात, कसे दिसतात, ते सर्वसाधारण इंग्रजांना कोठे माहीत होते? आणि त्या गर्दीतील काही इंग्रज अगदी गंभीरपणे हळूच फ्रेंच कैद्यांचे कोट पाठीमागून उचलीत व त्यांना शेपूट वगैरे आहे की काय हे पाहत! फ्रेंच म्हणजे माकडे असे इंग्रजांना खरोखरच वाटत होते. आज आपण शत्रूत शेपटे नाही पाहणार. परंतु दुसरे काही विशेष गुणधर्म पाहू. आपले शत्रू म्हणजे मूर्तीमंत सैतान असे आपण म्हणू. हिंदुस्थानासंबंधी असेच एक पुस्तक काही दिवसांपूर्वी लिहीले गेले. त्यात सा-या राष्ट्राची नालस्ती केलेली होती. हिंदुस्थान परसत्तेखाली आहे हे योग्यच आहे असे त्यात म्हटले होते. पृथ्वीवरुन तो अजिबात नष्टच व्हावा असे म्हटले नाही हे भाग्य! कार्लाईल संतापाने म्हणत असे की, राष्ट्रे कुत्र्यांप्रमाणे एकमेकींवर कुरघोडी करण्यासाठीच बहुधा जवळजवळ येत असतात. कुत्री जवळ येतात व एकमेकांच्या अवयवांचा वास घेतात. दुस-याला भोगण्याचीच फक्त इच्छा! दुस-याला लुटावे, दुस-याचे मालक व्हावे, स्वामी व्हावे यासाठीच त्याच्या जवळ जायचे! कर्लाईलचे म्हणणे तिखट असले तरी ते आजही खरे आहे. लेखी करारावर, कागदी समजुतींवर, जगाची शांती उभारता येणार नाही. आर्थिक तह व राजकीय गट करुन ही शांती निर्मिता येणार नाही. विचाराची व ज्ञानाची देवाण-घेवाण अधिक झाली पाहिजे. एकमेकांची ध्येये एकमेकांस अधिक कळली पाहिजेत. कल्पना, विचार, ध्येये यांचा व्यापार वाढू दे, या वस्तू जगभर जाऊ देत. एकमेकांची ओळख एकमेकांस होऊ दे. जगातील सुसंस्कृत लोकांची मने जवळ आली पाहिजेत. त्यांच्या सद्सदविवेकबुद्ध्याही जवळ आल्या पाहिजेत. जोपर्यंत फक्त भौतिक भरभराटच डोळ्यांसमोर असते. व्यापारी वैभवावरच डोळे खिळलेले असतात, जोपर्यंत शेजा-याशी आपले भेद आहेत असेच दिसते; परंतु आत्माच्या वैभावाकडे जर वळू व बघू. भागीदारीने जे आनंद कमी न होता उलट वाढतात असे जे मानसिक आनंद, त्यांच्याकडे जर आपण दृष्टी देऊ, तर सर्वत्र एकच मानवी स्वभाव नाचत आहे, एकच नाडी, एकच हृदय आहे असा साक्षात्कार होईल. हे आत्म्याचे वैभवच एक दिवस तारील. आर्थिक झगड्यांतील कटुता या आत्मदर्शनानेच कमी होईल. जगाच्या शांतीसाठी व संभाळासाठी लागणारी जीव्यापक सहानुभूती वा समजूत, ती अशा वृत्तीनेच येईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel