महान सारस्वतात आपण डुंबणार नाही, परमोच्च कलेत रमणार नाही. भावनांना क्षणभर उन्माद आणणा-या गोष्टी आपणास गुदगुल्या करतात, बुद्धीला क्षणभर उन्माद आणणा-या गोष्टी आपणास गुंगवतात. थोडा वेळ मन नाचते. थोडा वेळ आपण सौंदर्यसाधक गोष्टीत दंग होतो. असा हा सारा क्षणिक व तात्पुरता रस चाखण्यात आपण धन्यता मानतो. हे उच्च जीवन नसून क्षुद्र जीवन आहे. कृत्रिम संविधानके असलेल्या कथा, गुप्त पोलिसांची गूढे, शब्दांची कोडी या आपल्या बौद्धीक करमणुकी होऊन बसतात. या क्षुद्र वस्तू आपणास मोह पाडतात. याहून अधिक थोर आनंद चाखण्याची पात्रताच जणू आपणात नसते, क्षमताच जणू नसते. उंच उड्डाण करण्याची शक्ती जणू नष्ट झालेली असते. मग चिखलातच बुड्या मारायच्या व बेडकाप्रमाणे क्षणभर जरा वर उडी मारायची ! या अवस्थेतील मनुष्य कधी स्वतः विचार करीत नाही. जसे इतर वागतात तसा तो वागतो. जी एक चाकोरी पडलेली असते, तीतून तोही जातो. स्वतःच्या बुद्धीचा उपयोग तो करीत नाही. त्याचे जीवन डोळस नसते. ते आंधळे, मेंगरुळपणाचे असते. त्याची नैतिक दृष्टी स्थूल, वरवरची असते; त्याच्याजवळ विवेक व विचार नसतो. शास्त्रपूत अशी दृष्टी नसते. काही आवडीनावडी, काही पूर्वग्रह, काही वास्तवकल्पना, हीच त्याची वैचारिक व नैतिक पुंजी. रुढीप्रमाणे तो आपल्या जीवनाला आकार देतो. बरे दिसते, बरे वाटते, हेच एक वर्तनाचे प्रमाण. शिक्षणाची किंमत जर ते आजकालच्या स्पर्धेत यशस्वी होण्यास मदत करणार असेल तरच असते. शास्त्राला किंमत का ? तर ते उपयोगी पडते म्हणून, नाना सुखसोयी देते म्हणून, संघटितपणा वाढून यंत्रे उभारुन उत्पादन झपाट्याने करता येते म्हणून. परंतु बाह्य संचयाने आंतरिक सुसंस्कृतता वाढली आहे असे मात्र होत नाही. यंत्रे आली; परंतु युद्धे आहेतच. फरक इतकाच की पूर्वी हातघाईची युद्धे होत, आता यांत्रिक युद्धे होतात. मनुष्याची विनाशक शक्ती आज सहस्त्रपटीने वाढली आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या लोभास मर्यादा घालीत नाही, तोपर्यंत संहार होणार; या वाढत्या विध्वंसक शक्तीने पूर्वीपेक्षा अनंतपटीने होणार. आपण सारे रुढींचे दास बनल्यामुळे आपली मते गुलामी वृत्तीची झाली आहेत. व्यक्ती स्वतंत्र विचार करीतच नाही. आपली संस्कृती सर्वात श्रेष्ठ, आपली राज्यशासनपद्धतीच काय ती चांगली असे काही म्हणू लागताच, प्रत्येक व्यक्ती तेच बोलते व तदर्थ युद्धासही सिद्ध होते. जीवनशास्त्रातील आजचे महत् सूत्र म्हणजे ‘शक्तिदेवो भव’. पाशवी शक्तीवर श्रद्धा, तिच्यावर सारा भर! एका धर्माने अन्य धर्माचा छळ करावा, यात दुसरे काय दिसते ? अशा या समाजातूनही क्वचित् कोणी उदरात्मे निघतात. अरे, सारी वसुधाच कुटुंब माना, मानवजात एक माना, असे ते प्रतिपादितात; सर्वांचे हित, कल्याण पाहावे असे ते सांगू लागतात. लोकांची मने वळवावी, पण सोट्याने नव्हे तर त्यांना पटवून, असे ते बोलतात. एकाच प्रेममय परमेश्वराची आपण लेकरे, मग आपण सर्वांनी प्रेमाने एकत्र का नांदू नये, असे ते विचारतात. परंतु अशा उदार विचारांच्या लोकांना नास्तिक व देशद्रोही ठरविण्यात येते. त्यांच्यातील भित्रे असतात, त्यांना गप्प बसविण्यात येते; जे निर्भय असतात. त्यांना गोळ्या घालण्यात येतात. समाजाच्या या स्थितीला आर्थिक किंवा बोद्धिक रानटीपणा हे नाव शोभेल. कारण अशा या समाजात सुखविलास म्हणजेच संस्कृती असे समजले जाते, रुढी म्हणजेच नीती असे मानले जाते. धर्म म्हणजे जुन्या चाकोरीतून जाणे व राजकारण म्हणजे जगाच्या बाजारपेठा काबीज करणे आणि दुस-यास गुलाम करुन त्यांची पिळवणूक करणे अशा त्यांच्या व्याख्या असतात.