विश्रांतीमुळे आपण आपणास जाणतो. त्या वेळेस आपण आपले असतो. आपले वैचारिक स्वातंत्र्य त्यावेळेस आपण अनुभवतो. त्या वेळेस आपण आपले नियंते असतो. आपण आपले राजे असतो. आणि पूजेमुळे या विश्वाचा आत्मा आपण जाणू पाहतो; या सर्व विश्वाचा हेतू समजावून घेतो. परंतु आज काय झाले आहे पाहा. श्रमाने मनुष्य एकमेकांच्या जवळ येण्याऐवजी एकमेकांपासून दुरावत आहे, त्याची सामुदायिक, सामाजिक वृत्ती मारली जात आहे. विश्रांतीच्या वेळी मनाचे डोळे आंधळे केले जातात. आत्मारामाचे मंदिर बंद असते, आणि क्षुद्र मुल्यांचा स्वीकार करुन आपल्या दैवी वृत्ती निस्तेज व निर्जीव करण्यातच पूजेची इतिकर्तव्यता दिसून येते. जरा एकटे राहणे आज केवळ अशक्य झाले आहे. श्रमाच्या वेळी, विश्रांतीच्या वेळी किंवा पूजेच्या वेळी एकटे असणे म्हणजे लोकांना जणू दुर्भाग्य वाटते ! कारखान्यांत काम करु, गर्दीत घुसून मजा मारु, बाहेर जायचे झाले तरी जमावाने जाऊ, पाप करायचे असले तरी सर्व मिळून करु आणि प्रार्थनाही सामुदायिकरीत्या करु ! संध्याकाळच्या वेळी घरी निवांत बसणे, एकटेच जरा सृष्टीच्या सान्निध्यात फिरायला जाणे, आत्माचा विकास व आत्मचिंतन, या सर्व गोष्टी आज नीरस व कंटाळवाण्या वाटत आहेत. आजची आपली पिढी म्हणजे धावपळीची पिढी. ना विश्रांती, ना निद्रा. वास्तविक खरे म्हटले तर ज्याप्रमाणे विश्रांतीच्या वेळीच कला व साहित्य, तत्त्वज्ञान व धर्म यांचा जन्म होतो. विश्रांती, फुरसतीचा वेळ म्हणजेच सर्व संस्कृतीची जननी. परंतु आजची संस्कृती म्हणजे आपल्याच हातात सर्व सत्ता घेण्याची संस्कृती. या राक्षसी व सुलतानी संस्कृतीत मनाच्या उच्च विकासाला अवसरच नाही. खरोखरचे सात्विक चिंतन करायचे असेल तर एक प्रकारची शांती, एक प्रकारची स्तब्धता व एकाग्रता, एक प्रकारचा अलिप्तपणा यांची जरुरी असते. परंतु आजच्या संस्कृतीत या गोष्टी आहेत कोठे? आजची संस्कृती या अशा गोष्टींची शत्रू आहे. आज ज्ञान वाढले असले, तरी शहाणपण वाढले असे नाही.

आणि आजच्या या औद्यागिक युगाने, या यांत्रिक युगाने, आपणास पैशाचे पुजारी बनविले आहे. द्रव्य म्हणजेच देव ! श्रीमंत होऊ तरच सुईच्या भोकातून पार जाऊ असेच आज निश्चित वाटते आहे. पैसा म्हणजे स्वर्गातील राज्याचा सदर परवाना. कोणत्याही मार्गाने व वाटेल ती किंमत देऊन व्यवहारात यशस्वी होणे हेच आजचे ध्येय आहे. पैशामुळे मान, पैशामुळे स्थान. पैसा मिळविण्याची कला ज्याला साधली किंवा सुदैवाने ज्याला पैसा लाभला, त्याला समाजात सर्वोच्च स्थान आज दिले जाते. श्रेष्ठ-कनिष्टपणा मोजण्याचे पैसा हे साधन झाले आहे. हे यांत्रिक युग येण्यापूर्वी समाजातील मानपान मोजण्याची निराळी साधने होती. संत, विद्वान लोक, कवी, तत्त्वज्ञानी यांना समाज अग्रपूजेचा मान देई. जे ज्ञानाने व चारित्र्याने श्रीमंत असत, तेच लोकनायक बनत, त्यांच्याजवळ मालमत्ता किती आहे या गोष्टींकडे कोणी बघत नसे. परंतु ते दिवस गेले. गरिबीतही निर्मळ, निरागस व स्वाभिमानी राहण्याचे ते दिवस गेले. पैसे मिळविणे हा आजच्या जगातील एक अत्यंत आवडता व लोकप्रिय धंदा झाला आहे!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel