अनियंत्रित सत्तेपासून बचाव म्हणून लोकशाहीची आपण कास धरली. परंतु आज लोकशाहीचा जो व्यवहार दिसत आहे तो समाधानकारक नाही. राज्य शासन म्हणजे तंत्रमय अशी एक कला आहे व तिच्यात तज्ञ असणारेच सत्ताधारी होतात ही गोष्ट आज आपल्या अनुभवास येत आहे. लोकशाहीचा प्रत्यक्ष कारभार पाहू तर असे दिसेल की, खरोखर अत्यंत योग्य व कार्यक्षम अशी जी माणसे, ती क्वचितच राज्यकारभार चालवतात. ती माणसे पुढे येऊ शकत नाही. उत्कृष्ट माणसे लोकशाहीला जणू नको असतात.
उद्योगधंद्यांतच आज यंत्रयुग आहे असे नाही, तर राजकारणातही तेच आहे. लोकशाहीच्या नावाखाली कोणी तरी पुंजीपती उभा राहतो, तोच मागे उभा राहून सर्व राज्ययंत्र चालवतो. सारी कळ त्याच्या हातात असते. निवडून आलेल्या प्रतिनिधींना स्वातंत्र्य नसते. ते पुढारीपण घेऊ शकत नाहीत. आपल्या स्फूर्तीने काही करु शकत नाहीत. प्रतिनिधी म्हणजे बाहुलीच असतात. एका प्रचंड यंत्रातील ती लहानमोठी चाके असतात. आपल्या मतदारसंघातील मतदारांचे मत काय असेल याचा विचार हे प्रतिनिधी फारसा करीत नाहीत. सभागृहांतील चर्चांकडे त्यांचे लक्ष नसते. स्वतःची प्रामाणिक मतेही ते दूर ठेवतात. मत कोठे द्यावयाचे ते त्यांना आगाऊच सांगितलेले असते. यामुळे या सा-या चर्चा व हे वादविवाद केवळ भ्रमरुप व मायावी असतात. पक्षोपक्षी करण्याची जरुरच नसते. लोकशाही केवळ एक नाव आहे झाले!
लोकशाही युगात व्यक्तीचे स्वातंत्र्य तरी नीट राहीले का? तसेही नाही. युरोप व अमेरिका म्हणजे लोकशाहीची पूजक असे मानतात. व्यक्तित्वाला तेथे मान आहे असे समजतात; परंतु वास्तविक व्यक्तीच्या जीवनाला आज तेथे काडीचीही किंमत नाही. वैयक्तिक जीवनाची कोणी कदर करीत नाही. स्वातंत्र्याच्या म्हणून समजल्या जाणा-या या भूमीतून ‘हम करे सो कायदा’ हेच तंत्र आहे. अन्य संस्कृती व अन्य मानववंश यांच्यावर सूड घेणे व हल्ले चढविणे सुरु आहे. विरुद्ध मताच्या राजकीय पक्षांना दहशत बसावी म्हणून तेथे संघटना आहेत. व्यक्तींचे जीवन सुरक्षित नाही. वैयक्तिक सूडही घेतला जातो. कशाने तरी प्रतिस्पर्धी दूर करायचा. आज साम्यवादी रशियातही आपण काय करावे हे ठरविण्याचा व्यक्तीला अधिकार नाही. यांत्रिक व तांत्रिक परिणती हे ध्येय आसल्यामळे जशी जरुर असेल, त्याप्रमाणे ती ती माणसे तेथे पाठवली जातात. त्या त्या कामात त्यांना तरबेज करण्यात येते. आचारस्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य यांना तेथे स्थान नाही.