परस्परगैरसमज होताच एकमेकांचा त्याग न करता, एकमेकांस चिकटून राहणे यातच कृतार्थता आहे. एकमेकांच्या लहरी एकमेकांनी सांभाळल्या पाहिजेत. कोणाला कधी काय वाटेल, कोणाला कोणती हुक्की येईल, त्याचा काय नेम सांगावा ? कोणाची कोणती मनःस्थिती असेल, ते नीट पाहून वागले पाहिजे. परस्परांच्या आवडीनिवडी भिन्न असल्या, एकमेकांचे काही विशिष्ट स्वभाव असले, तरी त्यामुळे कंटाळून जाता कामा नये. अशा परिस्थितीतच आपल्या चिकाटीची, सहनशीलतेची कसोटी. अशातूनच सुंदर सहकार्य निर्मावयाचे. एकमेकांच्या आधाराने परस्परांनी विकास करुन घ्यायचा. एकमेकांनी काही पापे केली तरीही एकमेकांनी एकमेकांस सोडू नये असे मी म्हणेन. कितीही म्हटले तरी घटस्फोट खाली नेणारे दुबळे व अविकसित जीवच घटस्फोटाचा आश्रय करतात. आरोग्य व सुख हेच काय ते मानवी जीवनाचे साध्य असे त्यांस वाटते. स्वतःची आंतरिक वाढ त्यांच्या डोळ्यासमोर कधीही नसते. ज्यांची थोडीफार आंतरिक वाढ झालेली आहे, ज्यांच्या जीवनाचा थोडाफार विकास झाला आहे, असे लोक तीव्र वेदना झाल्या, जखमा झाल्या, तरी त्या दुःखाचा स्वीकार करतात. त्या दुःखाने त्यांचा आत्मा दुबळा न होता उलट अधिक बलवान होतो. परंतु स्वार्थी वृत्तीने आत्मा कधीही उन्नत होत नाही, शक्तिशाली होत नाही. पुरुषांपेक्षा स्त्रियांनीच अधिक सोशिकता व क्षमावृत्ती दाखविल्या आहेत. पुरुषांचे अपराध व चुका त्या पोटात घालतात. कारण त्यांच्यावर त्या प्रेम करतात. स्त्रियांमध्ये एक प्रकारची विशेष विकसित अशी सुंदर आध्यात्मिकता असते. पुरुषांनीही ती संपादण्याचा निश्चय केली तर बरे.

उच्चतर जीवनाक़डे जाण्यासाठी लहान मुले मदत करतात. आई-बापांना मुलांबद्दल उपजत प्रेम असते; आणि मुलांबरोबर वागताना साहजिकच आई-बाप समान भावनांचा अनुभव घेतात. नकळत उभयतांचे सहकार्य होते; सखीभाव वाढतो. परंतु अलीकडे आई-बाप मुलांकडे काडीमात्र लक्ष देत नाहीत. ती आपल्याच सुखात दंग असतात. मुलांबद्दलचे कर्तव्य काय, याचा विचारही त्यांना शिवत नाही. आता सरकारनेच बालसंगोपनगृहे स्थापिली आहेत. परंतु ही गृहे कधीही लोकप्रिय होणार नाहीत. मुलांच्या नानाविध विकासासाठी आई-बापांच्या प्रेमाची व समजुतदारपणाचीच जरुरी आहे. आई-बापाची जागा कोणीही भरुन काढू शकणार नाही. आई-बापांचे आध्यात्मिक जीवन जितके खोल असेल, तितके मुलांपासून दूर व्हावे असे त्यांना कमी वाटेल. घटस्फोटांचा नीट अभ्यास केला तर असे दिसेल, की बहुतेक घटस्फोट मुलाबाळांविरहित दांपत्यांनी केले. बहुतेक स्त्रियांना मुलबाळ व्हावे, अशी उत्कट इच्छा असते. त्यांना तसे आतून वाटत असते. पुरुषांनाही तशीच इच्छा असते. आणि जोपर्यंत ही अंतरइच्छा मेली नाही, जीवाची ही भूक नष्ट झाली नाही. तोपर्यंत लग्न म्हणजे आजन्म सख्य, मरेपर्यंत भागीदारी, असाच अर्थ राहील.

अर्वाचीन अशांतता आपणास बजावते की, सदगुण हे पडद्यात वाढत नाहीत. जे सदगुण सक्तीने, बाह्य दडपणाने आणले जातात, जे सदगुण विचारांची निर्मिती नसून अज्ञानाने व गतानुगतिकत्वाने म्हणून येतात, ते सदगुणच नव्हेत. निराधार व अगतिक वाटल्यामुळे स्त्रिया पतिनिष्ठ राहत असतील, कुटुंबात कशा तरी मारुन मुटकून समाधानाने नांदत असतील, तर त्याला का आपण सदगुण म्हणू ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel