जेथे इतकी आर्थिक विषमता आहे, तेथे राजकीय समता कोठून असणार? नविन, अधिक चांगली अशी समाजरचना निर्मिण्यासाठी आपल्या हातांत सर्व सत्ता घेण्याची खटपट श्रमजीवी लोक करीत आहेत. समाजसत्तावादी व साम्यवादी संघटना राज्ययंत्र आपल्या हाती घेऊ पाहात आहेत. राष्ट्रीयत्वाच्या कल्पनांचे बांध ढासळत आहेत व वर्गविग्रहावर भर दिला जात आहे. देशभक्तीचे खूळ भांडवलवाल्यांनी निर्मिले आहे. राष्ट्रभक्ती व देशभक्ती असल्या भ्रामक कल्पनांच्या भुतांपासून श्रमजीवी वर्ग मुक्त केला पाहीजे. ‘माझा वर्ग म्हणजे माझा देश’ असे साम्यवादी म्हणतो. आणि वर्ग नष्ट केल्याशिवाय, अस्तित्वात असणारे वर्गविग्रह दूर केल्याशिवाय, खरी लोकसत्ता अस्तित्वात येणार नाही असे तो म्हणतो.
ज्या मानाने स्वतंत्र विचारसरणीचे व स्वतंत्र इच्छेचे लोक समाजात असतील, त्या मानाने त्या समाजात राजकीय जीवन आहे असे समजावे. समाजाचे स्वास्थ्य नीट राहावयास हवे असेल तर विचार व आचार यांचा मोकळा खेळ सुरु असला पाहिजे. परंतु आजच्या लोकशाहीत कोठे आहे हे ? आजच्या समाजरचनेत आहे का हे शक्य ? मतदानाच्या पेटीत मते टाकण्याच्या जुगारापेक्षा दुसरी कोणती तरी अधिक चांगली पद्धती शोधून काढली पाहीजे. मानवी व्यवहार जिने अधिक सुरळीत व सुंदर रीतीने चालतील, अशी पद्धती शोधून काढण्यासाठी पराकाष्ठा केली पाहीजे.
आंतरराष्ट्रीय संबंध
मानवजातीवर प्रेम करणारा आजची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहून सुखावणार नाही. राष्ट्रे शांतीसुक्ते गातात व युद्धाची सिद्धता करीत असतात! युद्धाला जन्म देणारी मनोरचना सोडावयास ती तयार नाहीत. दुसरे आहेत तसे आपण अजून नाही म्हणून ईश्वराचे ते आभार मानीत असतात. आपली जात सर्वोत्कृष्ट व अति पवित्र, आपला धर्म म्हणजे जगाची आशा, आणि आपले राष्ट्रच जगाचे नेतृत्व करण्यास पात्र, असे सर्वांस वाटत असते. लहानपणापासूनच दुस-यास तुच्छ व स्वतःस उच्च समजणा-या या संकुचित राष्ट्रधर्माची शिकवण मिळत असते. निशाणे फडकविली जातात, शिंगे फुंकली जातात, देशभक्तीची व द्वेषाची गीते गायिली जातात. मागील युद्धात गुंतलेल्या प्रत्येक राष्ट्रास वाटत असे की, आपण लढाईत पडलो ते केवळ संस्कृतीच्या संरक्षणासाठी ! संस्कृतीच्या नावाखाली प्रत्येक राष्ट्राने वाटेल ते केले व त्याचे समर्थन केले. कत्तली केल्या, जाळपोळी केल्या, सारे उद्ध्वस्त केले, परंतु संस्कृतीसाठी म्हणून ते केले ! शिकारी कुत्रे सशावर किंवा कोल्ह्यावर ज्या क्रूरतेने तुटून पडतात, त्या क्रुरतेने माणसे माणसांवर तुटून पडावीत, क्रुरता माणसात येऊन माणसाने पशू बनावे, यासाठी आधी द्वेषाचे मंत्र कानीकपाळी ओरडले जात असतात. आपण विजयी झाले पाहिजे व इतरांना धुळीत मिळविले पाहिजे, ही उत्कट तीव्रता माणसाच्या मनात आधी उत्पन्न करावी लागते. माणसाचे मन द्वेषाग्रीने प्रज्वलीत करुन ठेवावे लागते. यासाठी अर्धवट सत्ये प्रस्तृत केली जातात. असत्य गोष्टी प्रसिद्धिल्या जातात. दुस-या राष्ट्रांविषयी व दुस-यांच्या संस्कृतीविषयी हेतुपुरस्पर विपर्यास सदैव केला जात असतो आणि अशा रीतीने माणसाला जंगली जनावर केले जाते. एखादा वक्ता रस्त्यात उभा राहतो, मोठ्या कुशलतेने हेतुपुरस्परपणे नाना गोष्टी व घडामोडी तो आपल्या व्याख्यानात गुंफतो. आणि सीझरचा रक्तरंजीत अंगरखा जनतेला दाखवून अँटनी ज्याप्रमाणे बोलला त्याप्रमाणे हे वक्ते केवढे भयाण व करुण दृश्य! भीषण देखावा ! सूड! खून! जाळा, मारा ! असे बालू लागतात.