सदैव सुखोपभोगासाठी धडपडणे म्हणजेच जीवन असे मानणे अधर्म होय. दुःख ही आकस्मिक गोष्ट नसून जीवनात ती ओतप्रोत भरलेली आहे. कष्टाने व त्यागानेच महत्त्वाच्या वस्तू संपादाव्या लागतात. वेदनांशिवाय वैभव नाही. जीवनाचे प्राप्तव्य प्रेयस् नसून श्रेयस आहे. ‘आनंदी जीवन’ नि ‘जीवनातील आनंद’ ह्या दोन निराळ्या गोष्टी आहेत. त्यागाने, दुःखमय जीवनाने जर ध्येयप्राप्ती होत असेल, तर तो त्याग, ते कष्ट आनंददायकच असतात. एखाद्याला सुखाचे जीवन जसे वाटत असेल, तसेच ध्येयार्थीला हे कंटकमय जीवन आनंदाचे वाटते. स्वतःच्या ध्येयाचा साक्षात्कार करुन देणारे असह्य असे दुःखही मनुष्य हसत सहन करतो. महाकवी गटे म्हणतो, ‘शिखरे मनाला आकर्षितात, तेथे नेणारा रस्ता नव्हे.’ त्या उच्चतेकडे आपले लक्ष असते. मग मार्ग कठीण व सुळक्याचा का असेना. रोजच्या बारीकसारीक गोष्टींतही हा न्याय दिसून येतो. शरीराला त्रास झाला तरी तो पत्करुन बायका नटतील, थटतील. पायांना सहन होत नसले तरी बूट घालतील. सौंदर्य प्रसाधनासाठी नाना सोस करतील. मनुष्य मनात आणील ते करतो. स्वतःची इच्छा चालविणे हेच जीवनातील पहिले महत्त्वाचे अंग असते. जीवनातील महत्त्वाची जरुरी ती हीच. परंतु ही स्वेच्छा विश्वतंत्राशी जुळवून घ्यावी. स्वतःची इच्छा व विश्वेश्वराची इच्छा यांत अविरोध निर्माण करावा. परंतु यामुळेच झगडे उत्पन्न होतात, मनाची धडपड सुरु होते. ‘रात्रंदिवस आम्हां युद्धाचा प्रसंग’ असे म्हणावे लागते. आपल्या रोजच्या जीवनात असे हे कुरुक्षेत्र हरघडी दिसून येते.

प्रत्येक व्यक्ती म्हणजे अविकसित गोळा आहे. सर्वांची वाढ व्हावयाची आहे. पशूवृत्ती आपणातून सर्वस्वी गेली आहे असे नाही. या पशूवृत्तीला आपण वळण देऊ शकू. तिचे दुस-या कोणत्या तरी उच्च वृत्तीत पर्यवसान करु. आत्माची मागणी आधी मान्य करावयास आपण शिकले पाहिजे. आत्मारामाचा हक्क आधी. यासाठी इतर वृत्तींवर नियंत्रण ठेवावे लागेल. अशा तपश्चर्येंतून व संयमातूनच विकास होत असतो. आपण देहवृत्ती असतो. आपणास विदेही व्हावयाचे असेल, आत्मसंस्थ व्हावयाचे असेल, तर आपण आपल्या आवडीनावडींना निराळे वळण दिले पाहिजे. आपल्या आंतर मनाचे नीट विनयन केले पाहिजे. यालाच निग्रह म्हणतात, वैराग्य म्हणतात. प्रत्येक पायरी चढताना मोह आडवे येतात. उच्च जीवनाकडे जाणे म्हणजे युद्ध आहे, खरोखरच झगडा आहे. परंतु उच्च जीवनाकडे गेले तर पाहिजेच. एरव्ही आपल्या व्यक्तीत्वाची परिपूर्णता नाही. अपरंपार त्याग करावा लागेल; परंतु फळही मोठे मिळेल. जसे मोल द्याल तसे फळ मिळेल. सर्व प्रकारच्या प्रगतीत खालचे सोडून वरचे घेणे हाच मार्ग आहे. क्षुद्राचा त्याग व उच्चाचा स्वीकार. अत्यंत क्षुद्र जंतूपासून तो आत्मार्थी पुरुषापर्यंत आपण पाहिले तरी हे दिसून येईल. हेतूपुरस्सर क्रमवार अखंड प्रयत्न किडीपासून तो महात्म्यापर्यंतच्या सर्व जीवांचे चालले आहेत. सर्वांच्या समोर ध्येय असते. प्रत्येकाचे काही करी गंतव्य-प्राप्तव्य असते. त्या त्या ध्येयानुरुप आपण साधने योजितो, प्रयत्न करतो. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्याच्या प्रयत्नांत ही हेतुपुरस्सरता, जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची वृत्ती अधिक स्पष्टपणे प्रतीत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel