यंत्रामुळे कंटाळवाणे तेच ते बैलासारखे काम करणे कमी होईल व मनुष्याला कलात्मक व सांस्कृतिक असे जीवन अनुभवायला अधिक अवसर मिळेल, अशी अपेक्षा होती. आज मानवी श्रम यंत्रामुळे कमी झाले आहेत, यात शंका नाही. परंतु त्यांनी कामात कंटाळवाणेपणा मात्र अधिक उत्पन्न केला आहे. आजच्या यांत्रिक उत्पादनाचा पाया श्रमाच्या आत्यंतिक विभक्तीकरणात आहे. एखादी मोटार तयार करायची असली तर हजारो भाग निरनिराळ्या खात्यांत तयार होत असतात. तीच एक वस्तु, तोच एक भाग त्या त्या कामगाराने मरेपर्यंत करावयाचा. त्यामुळे कामगारांच्या जीवनातील कारागिरी नष्ट झाली आहे. कामगार म्हणजे एक यंत्रच बनला आहे ! यंत्रासमोर तोही यंत्राप्रमाणे उभा असतो, व ते ते ठराविक भाग, त्या त्या ठराविक वस्तू यंत्रातून बाहेर काढीत असतो ! आज औद्योगिक कारखान्यात सौंदर्य, पावित्र्य, आनंद यांना स्थान नाही. कारागीर, जास्त मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हावे म्हणून एक यंत्र चालवणारा कामगार बनला आहे. कामगाराला कामात आनंद वाटत नाही, तेथे मनाला करमणूक नाही. शरीर मात्र थकून जाते. पूर्वी कारागीर आपल्या वस्तूच्या निर्मितीत आनंद मानीत असे. त्याच्या बुद्धीचा व चारित्र्याचा त्याच्या कर्मात विकास होत असे. परंतु आज बौद्धीक विकासासाठी, चारित्र्याच्या संवर्धनासाठी दुस-या गोष्टींची जरुर पडते. कामगारांना कामाबाहेर आनंद बघावा लागतो. उद्योगमंदिर आनंदमंदिर होत नाही. कारखानाच कलात्मक जीवनाचा अनुभव देऊ शकत नाही. आणि म्हणून कामगार अधिक मजुरी मागतो. कामाचे कमी तास असावेत, अशी मागणी करतो. कारण त्याला दुसरे काही शिकावेसे वाटते; मनाची करमणूक त्याला करुन घ्यावयाची असते; त्याला स्वतःचा विकास करुन घ्यायचा असतो; थोडा मोकळा वेळ त्याला पाहिजे असतो. परंतु चळवळी करुन कामगारवर्गाने जी थोडीफार फुरसत मिळवली तिचा विनियोग कसा केला जातो ? काही उत्तेजक करमणुकींत ती फुरसत खर्चिली जाते. कामगारांचा फुरसतीचा वेळ जावा म्हणून नाना प्रकारच्या मोहक करमणुकी उभ्या असतात. खिसा रिकामा होतो आणि रोजचे कारखान्यातील ते जड जीवन, ते शून्यमय जीवन, त्यापासून थोडा वेळ तरी अलग झाल्यासारखे वाटते. थोडा वेळ तरी त्या नीरस, प्राणहीन व यांत्रिक जीवनाचा विसर पडतो. * काम करीत असताना आपल्या ज्या उदार व उच्च वृत्ती दाबल्या गेलेल्या असतात, कोंडल्या गेलेल्या असतात, त्यांना समाधान देण्यात फुरसतीचा वेळ कोणी दवडीत नाही. म्हणून कामाचे तास कमी होऊन फुरसत मिळाली, परंतु फायदा काय झाला शंकाच आहे. ही फुरसत आशीर्वाद समजावी की शाप? कारखान्यांतून काम करणारे ओंगळ व गलिच्छ वस्तीत राहतात. त्यांचा वेळ दारुच्या गुत्त्यांत व चहाच्या दुकानात जातो. त्यांच्या आत्मांचे पोषण अशा ठिकाणी होत असते. एक म्हण आहे की, ‘जेथे तुझा ठेवा तेथे तुझे मन’ ही म्हण समुदायांना व व्यक्तींनाही लागू आहे. व्यक्ती आणि समुदाय कोणत्या वस्तूंना महत्त्व देतात हे समजून घ्यायचे असेल, तर आपला फुरसतीचा वेळ ती कसा दवडतात ते त्यांना विचारावे. हा जो मानवी जीवनाचा –हास होत आहे, भयंकर विनाश होत आहे, तो पाहून मन उद्विग्र होते. श्रम, विश्रांती व पूजा या मानवाच्या तीन आवश्यक गरजा आहेत असे प्रत्येक धर्म सांगतो. श्रमांमुळे आपण इतरांशी संबद्ध होतो. आपण सारे एकमेकांसाठी काम करीत आहोत ही बंधुभावाची भावना वाढते. आपण एकमेकांस अधिक यथार्थतेने जाणतो आणि सर्वांच्या सुखस्वास्थ्यांत भर घालण्याची आपली वृत्ती जागृत राहते.
(* वुईल्यम आर्चर ‘ज्ञान आणि चारित्र्य’ या पुस्तकात लिहितो, ‘जीवनातील कंटाळवाणेपणा दूर करावयास दुर्गुण हे एक साधन होते. निराश मनुष्य व्यसनी होतो. कंटाळवाणे काम करुन कंटाळलेल्या व थकलेल्या मेंदुला दुर्गुण व व्यसने जरा तरतरी देतात. रिकाम्या मेंदूतील शून्यतेची जड भावना व्यसनामुळे थोडा वेळ नष्ट होते.’)