या यांत्रिक उद्योगधंद्याच्या काळात आणखी एक महत्त्वाचा परिणाम झाला आहे व तो म्हणजे घर नाहीसे होणे. अमेरिकेत व रशियात ही गोष्ट दिसून येत आहे. ज्या कुटुंबातील प्रत्येकास आर्थिक स्वातंत्र्याची स्पृहा असते, तेथे कौटुंबिक संबंध व कौटुंबिक बंधने शिथिल होतात. स्त्रिया व पुरुष घराबाहेर कामे करतात आणि मुले जर घरी झोपलेली नसतील तर शाळेत किंवा कॉलजात किंवा क्रिडांगणावर, किंवा बोलपटगृहात कोठे तरी आपला वेळ दवडतात. ‘जीवनाचा प्रश्न’ या आपल्या पुस्तकात ट्रॉटस्की रशियाविषयी लिहितो, ‘पुरातन पद्धतीची जी कुटुंबपद्धती तिच्यावर फार महत्त्वाच्या व प्रचंड अशा आपत्ती आज आल्या आहेत. महायुद्ध व क्रांती यांनी ही जुनाट कुटुंबपद्धती कोलमडू पाहात आहे.... आपण अधिक समाजवादी आर्थिक सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. नाना प्रकारची कामे कुटुंबतील मंडळींना करावी लागतात. त्यांना सतत काळजी व चिंता वाटत असते. यापासून आपण त्यांना मुक्त केले पाहीजे. जर नवीन आर्थिक सुधारणा करु तरच हे शक्य होईल. धुणे वगैरे सार्वजनिक धोबीखान्यात पाहिजे. जेवणखाण सार्वजनिक भोजनालयात झाले पाहिजे. शिवणकाम सार्वजनिक कारखान्यात केले पाहिजे. मुलांचे शिक्षण बालसंगोपनगृहात सार्वजनिक शिक्षकांकडून झाले पाहिजे व शिक्षकही असे हवेत की ज्यांना ह्या कामाची खरोखर आवड आहे. असे आपण करु तरच पती व पत्नी यांना जखडून टाकणारे बंध ढिले होतील. बाह्य परिस्थितीमुळे व प्रासंगिक आणि आकस्मिक कारणांमुळे जी बंधने निर्माण होतात ती नष्ट होतील. पती-पत्नी परस्परांचे जीवनशोषण करणार नाहीत.’ याचा अर्थ थोडक्यात हा की, पुरुषालाही घरात स्थान नाही, स्त्रीलाही नाही; घर ही वस्तू नाहीशीच झाली!

हे यंत्रमय औद्योगिक युग नवीन नवीन गरजा उत्पन्न कराव्या, असे मानते. जे जे भोगावे त्याने भूक वाढतच जाते. गि-हाईकांच्या भुकेला जे मिळते त्यानेच ती भूक वाढते. भौतिक प्रगतीचा मार्ग म्हणजे अधिक मागणे, अधिक मिळवणे हाच होय. अशा उत्तेजक व प्रक्षोभक स्प्रधेमुळे जीनवातील शून्यता व निष्फळता आपण लपवू बघत असतो. हे यंत्रयुग मनुष्याच्या सर्वसाधारण गरजा भागवते. परंतु व्यक्तीच्या विशिष्ट इच्छेला येथे स्थान नाही. कला हद्दपार झाली, ती कोप-यात बसली.

राजकारण
लोकशाहीची तर आज सत्त्वपरीक्षा चालली आहे. ऱाजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने लोकशाही तितकीशी प्रिय आज नाही. इटलीत ती कोलमडली. स्पेनमध्ये तेच झाले. रशिया व चीनमध्येही तिच्याविषयी फारसे चांगले मत नाही. पूर्व युरोपच्या काही भागांत व दक्षिण अमेरिकेत प्रातिनिधिक लोकशाहीचे स्वरुप थोडेसे दिसते. परंतु तेथेही श्रद्धा डळमळू लागली आहे, संशय निर्माण झाला आहे. स्वित्स्झर्लंड, स्वीडन, नॉर्वे अशा लहान राष्ट्रांतच खरी लोकशाही जगू शकेल, अन्यत्र नाही, असे लॉर्ड ब्राइस म्हणाले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel