जो समाज केवळ शरीराचा उपासक आहे, जगणे हेच ज्याचे ध्येय, आर्थिक व शारीरिक सुस्थितीपलीकडे ज्याला काही दिसत नाही, शास्त्रांच्या संशोधनाने यांत्रिक क्षमता मिळविणे व पैदास वाढविणे हाच ज्याचा धर्म, तो समाज ख-या अर्थाने सुधारला व सुसंस्कृत झाला, असे कसे म्हणावे? जेथे उदार ध्येयांना वाव नाही, उच्चतर अशा अखिल मानवजातीला कवटाळणा-या विचारांना अवसर नाही, आत्म्याचे पंख जेथे छाटलेले आहेत, उच्च मतांचा जेथे कोंडमारा होतो, तो समाज का सुसंस्कृत ? शरीर, मन व आत्मा या तीन वस्तू पृथक असल्या तरी त्या अलग करता येणार नाहीत. या तीनही मिळून एक अविभाज्य अशी वस्तू बनलेली आहे. या तिहींचा नीट विकास म्हणजेच खरी संस्कृती. मानवी स्वभाव सर्वत्र सारखाच आहे. शरीर, मन व बुद्धी यांच्यात विरोध आला तर तो मिटविणे हेच महत्त्वाचे काम होय. या तिहींतील विरोध पाहून वाटून घेण्याची जरुरी नाही. त्या तिहींतील कुरबरी मोडून टाका. निर्दोष मनुष्यत्वासाठी सुंदर शरीर आधी हवे. शरीर निरोगी हवे, धडधाकट हवे. तसेच सुखासमाधानाचा संसार चालवण्यासाठी काही सामजिक व आर्थिक संघटनाही हवी. परंतु एवढ्यानेच सारे संपले असे नाही. केवळ आपल्यातील पशुत्वाचा पूर्ण विकास केल्याने मानवता परिपूर्ण झाली असे नव्हे. सत्य, शिव व सुंदर यांची पूजा करु पाहणा-या मानवी प्राण्यांना निर्मिण्यासाठी सृष्टीने कितीतरी दुःख सहन केले आहे; असा मनुष्यप्राणी जन्मावा म्हणून विश्वात किती तरी प्रयत्न झाले, धडपडी झाल्या. अर्धवट सुधारलेले व संपूर्णपणे सुधारलेले यांच्यात कोणता बरे फरक असतो ? जो फक्त स्वतःचेच पाहतो, स्वतःच्याच वैयक्तिक, क्षुद्र व संकुचित वर्तुळात रमतो मीच काय तो खरा, मी कसा जगू, माझे समाधान, या ‘मी मी’ पलीकडे  ज्याच्या विचारांची मजल जात नाही तो अर्धवट सुधारलेला. आणि जो स्वतःला शुन्य करुन सर्वभूतहितांत रमतो तो संपूर्णपणे सुधारलेला. व्यक्तीने विश्वात्मक दृष्टीचे होणे, आपले दैनंदिन जगणेही चिरशाश्वत सत्याशी जोडणे आणि अशा प्रकारे खरोखरच मानव होणे म्हणजे संस्कृती. असे वाढत जाणे सोपे नाही. त्यासाठी महान त्याग लागतो, खूप किंमत द्यावी लागते. परंतु एकदा का ही दृष्टी आली, एकदा का आपली सारी वृत्ती सर्वांचा विचार करणारी झाली, एकदा का हे आपले व्यक्तित्व विश्वाच्या ध्येयाशी समरस करण्याचे जमले, तर मग पुढे सारे सोपे जाते. एक विशिष्ट दिशा लावण्याचेच अवघड असते. एकदा ती दिशा लागली म्हणजे मग जोखड जड वाटत नाही, भार कठीण होत नाही. आपण सारे ओझे सहज ओढीत नेतो. अशी दृष्टी आली म्हणजे मानवी जीवन निराळे होईल. आज आहे त्यापेक्षा निराळी विचारसरणी, निराळी वृत्ती दिसू लागेल. पशूचे जीवन व पाशवी वृत्ती जाऊन मानवी जीवन व मानवी मन यांचा साक्षात्कार होऊ लागेल.*

मानवी समाजाचा इतिहास पाहिला तर अमूक एका काळी संपूर्णपणे रानवटपणा होता किंवा अमूक एका काळी केवळ रामराज्य होते असे दिसून येत नाही. कोणताही समाज केवळ जंगली किंवा केवळ निर्दोष असा आढळून येणार नाही. कोणत्याही काळातील व कोठलाही मानवसमाज घ्या. त्याने आपल्या विशिष्ट स्वभावाचा विकास केला, धार्मिक आचारविचार निर्माण केले, सामाजिक नियमने निर्मिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel