“काय आहे म्हणणें?” त्यानें विचारलें.
“आपल्याला कान आहेत का नाहींत?” लोकांनी विचारलें.
“जरा लांब करा त्याचे कान.” संतापून कोणी बोललें. परंतु दयारामांनीं हात वर केला व सारे शांत राहिले. त्यांनीं लोकांची स्थिति सांगितली. जुलूम-जप्तीचे प्रकार सांगितले आणि शेवटीं म्हणाले, “लोकांत त्राण नाहीं. सुकलेला संसार आहे. ठिणगी पडेल तर भडका होईल. परंतु सरकारची सहानूभुति मिळेल तर हिरवें हिरवें दिसेल. पहा, ठरवा काय तें.”
“मी विचार करीन. तुम्ही आतां जा.” असें म्हणून मामलेदारानें प्रणाम केला. शेतकरी हर्षले. त्यांचा तो विजय आहे.”
“आणि त्यानें नमस्कार केला. शेतक-यांस नमस्कार.” शेतक-यांत एक प्रकारचे नवचैतन्य आलें. संघटनेचें सामर्थ्य कळलें. निर्भयता आली. निर्भयता उत्पन्न होणें, मेलेलें मन जिवंत होणें, ही महत्त्वाची वस्तु आहे.
शेतक-यांत असा उत्साह उसळत होता. कांहीं होईल असें वाटत होतें. परंतु गाईला सोडून न्यायला विरोध करणा-या त्या शेतक-यावर खटला करण्यांत आला. सरकारी कामांत अडवणूक हा त्याचा भयंकर गुन्हा! लोकांना धडा घालून देण्याची जरूरी होती. त्या शेतक-याला चार महिन्यांची सक्त मजुरी मिळाली! किती न्यायी सरकार!
दयाराम संतापानें लाल झाले. त्यांनीं त्या शेतक-याच्या गांवीं मोठी सभा केली. तुम्ही माणसें का मढीं असा त्यांनीं प्रश्न केला. “त्या शेतक-यास हातकड्या घालून नेण्यांत आलें. तुम्हीं कां अडवलें नाहीं? नाहीं याला नेऊं देणार असें सांगायला तुम्ही एकजात कां नाहीं उभे राहिलां? आम्हांला सर्वांनाच न्या अटक करून म्हणून कां नाहीं सांगितलेंत? असे कसे तुम्ही खानदेशी कापसासारखें मऊ भुसभुशीत? खानदेशी मातीसारखे जरा टणक बना. खानदेशी मातीचे किल्ले केले तर दगडाहूनहि बळकट होतात. जर तुम्ही मनांत आणाल तर शूर व्हाल. कोण तुम्हांला हात लावील, तुमच्या गाईंना हात लावील, तुमचे पवित्र चरखे जप्त करील?” आणि ते एकदम गाणें गाऊं लागले—
मर्द बनो, मर्द बनो
अब भारतवासी मर्द बनो।।
लूट गया है तेरा सारा
आंखों में है आंसु धारा
जानवरों को नहिं है चारा
अब मेरी एक ही बात सुनो।।अब भारत.।।
घर में तो नहिं एक ही दाणा
क्यों फिरता है तूं दिनवाणा
झट संघटन में सामिल होना
करना अपना राज्य सुनो।।अब भारत.।।