“स्वागताला उभीच आहेस!”
मोटार गेली. गुणा घरांत आला इंदु आनंदली. फुलली.
“आतां मी बरी आहे की नाही सांग गुणा!”
“चांगलीच बरी झालीस.”
“दृष्ट पडेल हो तुझी.”
“माझी का दृष्ट पडेल?”
“दुस-या कोणाची पडेल! दुस-या कोणाची दृष्ट माझ्यावर पडत असली तरी ती मला माहीत नसते. परंतु तूं दृष्टि रोखलीस कीं मला पटकन् भान येते. मी एक तुझीच दृष्टी जाणते. तुझेच डोळे ओळखते.” गप्पागोष्टींत दिवस जाऊ लागले.
एके दिवशी गुणा सारंगी वाजवीत होता.
“तुमच्या सारंगीबरोबर तुमचा मित्र गायला असता तर किती बरे झाले असते! बोलवा हो तुमचा मित्र.” मनोहरपंत एकदम म्हणाले.
“गुणा, खरेच बोलाव. पुरे झाला अज्ञातवास. आतां पांडवांना प्रकट होऊ दे. मग आपण पद्मालयास जाऊं. तूं तांबडी कमळे आणून माझी पूजा कर. मी मोराची पिसे गोळा करून तुझ्या डोक्यावर मोरमुकुट घालीन. छान दिसेल तुला.”
“मग तुझी मला दृष्ट बाधेल.”
“लिहा एरंडोलला पत्र. आजच जाऊं दे.” मनोहरपंतांनीं आग्रह धरला.
“इंदूला आणखी करमणूक होईल.” आई म्हणाली.
आपला मित्र एरंडोलला नाही हे गुणाला माहीत होते. परंतु त्याने एकपत्र लिहिले. लांबलचक एक पत्र लिहिले. इंदिरेने ते वाचले तरी हरकत नाही. तिला ते पत्र वाचून आनंद होईल, अशा हेतूनेच त्याने ते लिहिले. ते पत्र गेले. काय उत्तर येते त्याची तो वाट पहात बसला.