रामराव यांना एकच मुलगा होता. त्यांचे नांव गुणा. गुणावर त्यांचें फार प्रेम होतें. तो त्यांची आशा. तोच जणुं त्यांची इस्टेट. बाहेर त्यांना आतां फार मान मिळत नसे. कधीं कधीं अपमानहि होत. परंतु घरीं येऊन गुणाला पाहिलें कीं सारे अपमान ते विसरून जात. गुणा खरोखर गुणांचा होता. दिसे सुंदर, हंसे सुंदर. त्याच्या भिवया फारच सुंदर होत्या. कान लांब होते. जणुं देवाची मूर्ति असा तो दिसे.

आणि आतां गुणाची मुंज करावयाची होती. जवळ तर दिडकी नाहीं. परंतु नांव तर मोठें. थाटानें मुंज नको का करायला? परंतु कर्ज देणार कोण? कोणाकडे जावयाचें? शेवटीं रामराव पंढरीशेटकडे गेले. पंढरीशेट म्हणाले—

“हें पहा रामराव, आतां तुम्हांला पैसे देण्यांत अर्थ नाहीं. कोणीहि शहाणा सावकार तुम्हांला आतां पैहि देणार नाहीं.”

“तुम्ही कांहीं करा, परंतु माझी अब्रू सांभाळा. गुणाची मुंज केलीच पाहिजे. आणखी किती आतां वाट पहावयाची? परंतु नुसती लंगोटी थोडीच लावायची? मोठें नांव पडलें ना? थोडा फार खर्च करायलाच हवा.”

“परंतु असे कसे पैसे द्यावयाचे?”

“पंढरीशेट, माझ्याजवळ आतां काय राहिलें आहे? सारी शेती गहाण पडली. घरांत दागदागिना राहिला नाहीं. मी तुमचे पैसे परत करीन. कर्ज फेडल्याशिवाय मी मरणार नाही.”

“अहो, कसे फेडणार कर्ज? शब्दांनी का फेडतां येते? तुमचे राहते घर आहे. तें देता का लिहून? कांहीतरी आधार हवा. आधाराशिवाय मी कसे देऊं पैसे? देता घर लिहून? बोला.”

“वडिलोपार्जित वाडा गहाण ठेवायला वाईट वाटतें.”

“परंतु त्याशिवाय पैसे मिळणार नाहींत.”

रामराव निराश होऊन घरीं गेले. त्यांनी आणखी कांहीं ठिकाणीं प्रयत्न केला. परंतु पैसे कोठेंहि मिळत ना. शेवटीं रामरावांनी आपलें राहतें घर गहाण ठेवलें. ते लिहून दिलें. अर्थात् त्यांना त्या घरांत रहावयास परवानगी होती. घर लिहून देतांना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलें.

“पंढरीशेट, तुम्हीं शेवटीं मला रडविलेंत!”


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel