“नाही विचारीत हो प्रश्न. तुझा प्रेमरंग मला लुटूं दे. वाटतें तुला लहान करून डोळ्यांत ठेवून द्यावें. हृदय उघडून आंत ठेवून द्यावें. माझ्या मुठीत राहशील तूं”
“तुझ्या मुठीत मी आहें.”
तसें नव्हे वेड्या. असा इतका लहान हो की जणुं मोग-याचे फूल. गुलाबाचे फूल. जगन्नाथ, तुला असें होतां आले असतें तर किती मजा झाली असती ! तूं पुन्नागाचे फूल झाला असतास तर माझ्या कानांत मी तुला घातलें असतें. तूं गुलाब वा चाफा झाला असतास तर तुला केसांत बांधून ठेवलें असतें. तुझा वास घेतला असता. या दोन बोटांत तुला पकडून ठेवलें असतें. लोकांना वाटलें असतें फूल. परंतु ही तुझी मूर्ति आहे हें फक्त मला माहीत नाही ? तूं हंसला असतास, मी हंसले असतें. जगन्नाथ, होतोस लहान? ”
“होणार आहे लहान.”
“खरेच?”
“तुला नाही माहीत? लहान होणार आहे. तुझ्या मांडीवर खेळणार आहे. तुझ्या हातांत मावणार आहे. तू मला नाचवशील, वर उडवशील, झेलशील. तुझ्यासाठी लहान होणार आहे. मग मला मारशील, रागावशील.”
“आणि अगणित मुके घेईन.”
“होणार आहे ना लहान?”
“पुष्कळ अवकाश आहे अजून.”
“कावेरी, आपण किती दिवस भटकायचे?”
“कंटाळलास तू? भटकू. आणखी काही दिवस भटकूं.” ती दोघे नीलगिरी पर्वतात गेली. किती सुंदर पर्वत. किती फुले. निळीनिळी दिसणारी शिखरे. आणि मधूनमधून स्वच्छ पाण्याची तळी. हिरवी निळीं झाक मारणारी तळी. कावेरी व जगन्नाथ हिंडत हिंडत एका टेकडीच्या जवळ गेली. तेथे एक सुंदर तळे होते. किती निर्मळ पाणी!
“जगन्नाथ, टाक उडी.”
जगन्नाथने उडी टाकली. पद्मालयाची त्याला आठवण झाली.
“तूहि टाक.” तो म्हणाला.